Rashid Khan: फिरकीचा जादूगार राशिद खान आयपीएल 2022 मध्ये त्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याच्या फलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. वानखेडे स्टेडियमवर काल सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात राशिद खाननं फलंदाजीनं चाहत्यांचं भरपूर मनोरंजन केलं. अखेरच्या षटकात तीन षटकार मारून राशिद खाननं हैदराबादच्या तोंडातून विजयी घास हिसकावून घेतला. या विजयानंतर राशिद खाननं कर्णधार हार्दिक पांड्या आणि राहुल तेवतिया यांच्याशी गप्पा मारताना आपल्या शॉटचं नाव सांगितलं. हे नाव ऐकल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या.


दरम्यान, गुजरातच्या विजयानंतर राशिद खाननं हार्दिक पांड्या आणि तेवतिया यांच्याशी बोलताना मार्को जेन्सनच्या गोलंदाजीवर खेळलेल्या शॉटबद्दल सांगितलं. राशिदनं ऑनसाईडवर खेळलेले काही विचित्र शॉट पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले. या शॉटला स्वत: राशिद खाननं 'द स्नेक शॉट' असं नाव दिलं. यामागचं कारणही त्यानं सांगितलं. एखाद्याला चावल्यानंतर साप पुन्हा फना काढतो, असं स्पष्टीकरण देत राशिदनं त्याच्या शॉटला द स्नेक शॉट नाव दिलं.


ट्वीट-



गुजरातला शेवटच्या षटकात 22 धावांची गरज होती. राहुल तेवतियानं पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. यानंतर रशिदनं तीन षटकार मारून गुजरातला विजय मिळवून दिला.  हैदराबादविरुद्ध सामना जिंकल्यानंतर राशिद खान म्हणाल की "खूप छान वाटत आहे. माझा माझ्या फलंदाजीवर आणि फिटनेसवर विश्वास होता की मी फटकेबाजी करू शकतो. सनरायझर्सविरुद्ध अशी कामगिरी केल्याचा मला आनंद आहे".