IND vs SA T20 Series: आयपीएल 2022 नंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ जूनमध्ये भारताचा दौरा करणार आहे. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे.  या मालिकेपूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे.  दुखापतीमुळं सूर्यकुमार यादव नुकताच आयपीएल 2022 बाहेर पडलाय. गुजरात टायटन्सविरुद्ध सामन्यात त्याला दुखापत झाली होती. 


'इनसाइड स्पोर्ट्स'च्या वृत्तानुसार, सूर्यकुमारची दुखापत गंभीर आहे. अशा स्थितीत त्याला दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर ठेवले जाऊ शकते.  "सूर्यकुमारला विश्रांतीची गरज आहे. त्याची दुखापत गंभीर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याची निवड होण्याची शक्यता कमी आहे. त्याला लवकर संघात समाविष्ट करणे आम्हाला परवडणारं नाही. त्याची दुखापत आणखी वाढू नये असं आम्हाला वाटते", अशी माहिती  निवड समितीच्या एका सदस्याच्या हवाल्यानं देण्यात आली आहे. 


गुजरातविरुद्ध सामन्यात दुखापत
ब्रेबॉर्न स्टेडियमवर 6 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवला दुखापत झाली. दुखापतीच्या गंभीरतेमुळं तो आयपीएल 2022 च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला. याआधी दुखापतीमुळं सूर्यकुमार या हंगामातील सुरूवातीचे तीन सामने खेळू शकला नव्हता. अंगठ्याच्या दुखापतीमुळेत्याला संघाबाहेर राहावं लागलं होतं.


सूर्यकुमार यादवची आयपीएल 2022 मधील कामगिरी
दरम्यान, गुजरातविरुद्ध गेल्या आठवड्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादवनं मुंबईसाठी आठ सामने खेळले आहेत. ज्यात 43.29 च्या सरासरीनं 303 धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवला दुखापतीमुळं आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सुरूवातीच्या तीन सामन्यांना मुकावं लागलं होतं.


हे देखील वाचा-