IPL 2022, GT vs LSG : शुभमन गिलच्या संयमी अर्धशतकानंतर राशिद खान याने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर गुजरातने लखनौचा 62 धावांनी पराभव केला. माफक 144 धावांचा बचाव करताना गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा केला. लखनौचा संपूर्ण संघ 82 धावांत संपुष्टात आला. यंदाच्या हंगामातील गुजरातचा हा नववा विजय होता. लखनौचा पराभव करत गुजरातने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केलाय. आज झालेल्या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात...


गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 


प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात खराब झाली. वृद्धीमान साहा पाच धावा काढून बाद झाला..त्यानंतर मॅथ्यू वेड आणि हार्दिक पांड्याही झटपट बाद झाले.. मॅथ्यू वेड दहा तर हार्दिक पांड्या 11 धावांवर बाद झाला... 


एका बाजूला विकेट पडत असताना सलामी फलंदाज शुभमन गिल संयमी फलंदाजी करत होता.. पण दुसऱ्या बाजूला एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्या... गिलने मिलरसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मिलर 26 धावा काढून बाद झाला.. मिलरने 24 चेंडूत 26 धावांची खेळी केली. 


राहुल तेवातियाने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत संघाचा डाव 140 पार नेला. राहुल तेवातियाने 16चेंडूत 22 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान राहुल तेवातियाने चार चौकार लगावले. शुभमन गिलने एका बाजूने गुजरातचा डाव सावरला. गिलने 49 चेंडूत 63 धावांची खेळी केली.  


लखनौकडून मोहसीन खान याने कंजूष गोलंदाजी केली. मोहसीन खानने चार षटकात 18 धावा देत एक विकेट घेतली. तर आवेश खानने चार षटकात 26 धावा देत दोन विकेट घेतल्या. जेसन होल्डरनेही एक विकेट घेतली. 


गुजरातने दिलेल्या माफक 144 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात माघारी परतले. डिकॉकने 11 तर राहुलने 8 धावा केल्या. दीपक हुडाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र एकाही फंलदाजाने त्याला साथ दिली नाही. 


दीपक हुडाने 27 धावांची छोटेखानी खेळी केली. करण शर्मा 4, क्रृणाल पांड्या 5, आयुष बडोनी 8, मार्कस स्टॉयनिस 2, जेसन होल्डर 1, मोहसीन खान 1 आणि आवेश खान 12 धावा काढून बाद झाले. 


गुजरातकडून फिरकीपटू राशिद खान याने भेदक मारा केला. राशिदने 3.5 षटकात 24 धावा देत चार गड्यांना बाद केले. राशिदने आवेश खान,  जेसन होल्डर, क्रृणाल पांड्या आणि दीपक हुड्डा यांना बाद केले. 


आर साई किशोर आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली तर मोहम्मद शामीने एक विकेट घेतली. शामीने तीन षटकात फक्त पाच धावा दिल्या. 


यंदाच्या हंगामातील गुजरातचा हा नववा विजय होता. लखनौचा पराभव करत गुजरातने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केलाय. तसेच या विजयासह गुजरातच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणारा गुजरात पहिला संघ आहे.