Suryakumar Yadav IPL 2023: भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) बॅट गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे शांत झाली आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तो सातत्याने फ्लॉप ठरत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील खराब कामगिरीनंतर आयपीएल 2023 मध्येही सूर्याची बॅट शांतच झालेली पाहायला मिळत आहे. आयपीएलमधील (IPL 2023) सलग तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार स्वस्तात बाद झाला. मंगळवारी (11 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादव गोल्डन डकचा बळी ठरला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला मुकेश कुमार याने तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्याच चेंडूवर विकेट देण्याची गेल्या सात डावांतील ही चौथी वेळ होती. सूर्याच्या या खराब फॉर्मवर सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. 


सूर्याच्या या खराब फॉर्मची सुरुवात 2023 च्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या नागपूर कसोटीपासून झाली. पदार्पणाच्या कसोटीत तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ 8 धावा करु शकला. त्यानंतर या कसोटी मालिकेत त्याला पुन्हा संधी मिळाली नाही. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा भाग होता पण येथे तो तिन्ही सामन्यांमध्ये गोल्डन डकचा बळी ठरला. टी-20 क्रिकेटचा नंबर-1 फलंदाज अशा प्रकारे पहिल्याच चेंडूवर विकेट जाणं ही सर्वांसाठीच आश्चर्याची गोष्ट होती. 


आता तर आयपीएलमध्येही सूर्याची बॅट फ्लॉप ठरत आहे. आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला केवळ 15 धावा करता आल्या. दुसऱ्या सामन्यात सूर्या चेन्नईविरुद्ध एक धाव काढून बाद झाला. सलग तिसऱ्या सामन्यात सूर्या जेव्हा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल करण्यात आलं. क्रिकेट चाहत्यांनी त्याच्यावर खूप मीम्स बनवले.


सूर्यकमुार यादववरच्या प्रतिक्रिया पाहा...














मुंबई इंडियन्सकडून दिल्लीचा धुव्वा 


अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केली. तर तिलक वर्मा याने झटपट 41 धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी पाच धावांची गरज होती. पण एनरिख नॉर्जे याने यॉर्कर गोलंदाजी करत टिम डेविड आणि कॅमरुन ग्रीन यांना धावा काढून दिल्या नाहीत. अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील मुंबईचा पहिला विजय आहे. तर दिल्लीचा सलग चौथा पराभव झाला.
 
रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी केली. पहिल्या चेंडूपासून रोहित शर्मा याने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहित शर्माने 45 चेंडूत 65 धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्मा याने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. रोहित शर्मा याने सुरुवातीला ईशान किशन याच्यासोबत 71 धावांची भागीदारी केली. त्यानंतर तिलक वर्मा याच्यासोबतही अर्धशतकी खेळी केली.