RR vs SRH, IPL 2023 : अटीतटीच्या लढतीत हैदराबादने राजस्थानचा चार विकेटने पराभव केला. अखेरच्या दोन षटकात रंगलेला थरार हैदराबादने जिंकला. राजस्थानने दिलेले २१५ धावांचे आव्हान हैदराबादने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. या विजयासह हैदराबादने स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवलेय. अखेरच्या दोन षटकात हैदराबादने बाजी मारली. ग्लेन फिलिप्स याने सात चेंडूत २५ धावांची खेळी केली. तर अब्दुल समज याने सात चेंडूत १७ धावांचे योगदान दिले. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची गरज असताना संदीप शर्माने नो बॉल फेकला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर अब्दुल समद याने षटकार लगावत हैदराबादला विजय मिळवून दिला. युजवेंद्र चहलच्या चार विकेट आणि जोस बटलर आणि संजू सॅमसनची वादळी खेळी व्यर्थ गेली.


राजस्थानने दिलेल्या २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने संयमी सुरुवात केली. अनमोलप्रीत सिंह आणि अभिषेक शर्मा यांनी दमदार सुरुवात केली. अनमोलप्रीत सिंह याने २५ चेंडू ३३ धावांचे योगदान दिले. यामध्ये एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागिदारी केली. अनमोलप्रीत सिंह बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादचा डाव सावरला. अभिषेक शर्मा याने ३४ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. या खेळीत अभिषेक शर्मा याने दोन षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. राहुल त्रिपाठी याने २९ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले.




हेनरिक क्लासेन याने १२ चेंडत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले. एडन मार्करम सहा धावा काढून तंबूत परतला. मार्करम बाद झाल्यानंतर सामना हैदराबादच्या हातून निसटला असाच प्रसांग झाला होता. पण ग्लेन फिलिप्स याने वादळी फलंदाजी केली. फिलिप्स याने सात चेंडूत तीन षटकार आणि एका चौकारांच्या मदतीने २५ धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर अखेरच्या षटकात अब्दुल समद याने उर्वरित काम केले. अब्दुल समद याने सात चेंडूत १७ धावांचे योगदान दिले. अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती. त्यावेली संदीप शर्मा याने नो चेंडू फेकला. त्यानंतर अब्दुल समद याने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत हैदराबादला विजय मिळवून दिला. मार्को यानसन तीन धावांवर नाबाद राहिला. अखेरच्या १२ चेंडूवर हैदराबादला विजयासाठी ४१ धावांची गरज होती... त्यावेळी ग्लेन फिलिप याने वादळी फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला. राजस्थानने आजच्या सामन्यात फिल्डिंगही खराब केली. 





राजस्थानकडून युजवेंद्र चहल याने भेदक मारा केला. चहल याने चार षटकात २९ धावांच्या मोबद्लयात ४ विकेट घेतल्या. त्याशिवाय आर अश्विन याने एक विकेट घेतली. कुलदीप यादव याने एक विकेट घेतली.