Rashid Khan IPL 2023 Catch: गुजरातने दिलेल्या २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौच्या सलामी फलंदाजांनी वादळी सुरुवात केली होती. काइल मेयर्स आणि क्विंटन डि कॉक यांनी ८८ धावांची सलामी दिली. या जोडीने पावरप्लेमध्ये ७२ धावांचा पाऊस पाडला होता. मोहित शर्माने ही जोडी फोडत लखनौला मोठा धक्का दिला. मोहित शर्माने ४८ धावांवर काइल मेयर्स याला बाद केले. या विकेटनंतर लखनौचा डाव गडगडला.. काइल मेयर्सने ३२ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि सात चौकार लगावले आहेत. तर क्विंटन डिकॉक याने ७० धावांची खेळी केली. या खेळीत क्विंटन डिकॉक याने तीन षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने ७० धावांचा पाऊस पाडला.
काइल मेयर्स आणि क्विंटन डि कॉक यांनी गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. आठ षटकात प्रति षटक दहा धावा काढत गुजरातला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. पण नववे षटक मोहित शर्मा याने टाकत ही जोडी फोडली. नवव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मेयर्स याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण राशिद खान याने जबरदस्त झेल घेत मेयर्सची खेळी संपुष्टात आणली. राशिद खानचा झेल पाहून सर्वजण चकीत झाले.. राशिद खान धावत आला अन् जबरदस्त झेल घेतला. या झेलची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. करामती खान राशिदने घेतलेला झेल आतापर्यंतचा सर्वोत्म झेल असल्याचे नेटकरी म्हणत आहे.
राशिद खानच्या झेलचे कौतुक आरसीबीच्या विराट कोहलीनेही केलेय. विराट कोहलीने ट्वीट करत राशिद खान याने घेतलेल्या झेलचे कौतुक केलेय. आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल असल्याचे विराट कोहलीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय. त्याशिवाय राशिद खानचा झेल घेतानाचा फोटोही पोस्ट केलाय. दरम्यान, राशिद खान याने याआधी मेयर्सचा झेल सोडला होता..
गुजरातचा लखनौवर ५६ धावांनी विजय
GT vs LSG, IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातने लखनौचा 56 धावांनी पराभव केलाय. गतविजेत्या गुजरातने प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केलेय. गुजरातने ११ सामन्यात आठ विजय मिळवत १६ गुणांची कमाई केली आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यातील ही लढत एकतर्फी झाली. २२८ धावांचा बचाव करताना गुजरातने लखनौला १७१ धावांत रोखले. मोहित शर्माने ४ विकेट घेत विजयात मोलाचे योगदान दिले. साहा आणि गिल यांच्या वादळी अर्धशतकानंतर मोहित शर्माने भेदक मारा केला. गुजरातने लखनौला आयपीएलमध्ये चौथ्यांदा पराभूत केलेय. गुजरातविरोधात लखनौला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.