Mayank Yadav: आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने 157 च्या वेगाने चेंडू टाकून जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. क्रिकेटमधील अनेक मोठे दिग्गज मयंक यादवची स्तुती करत आहेत. दरम्यान, इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये 600 हून अधिक विकेट घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने देखील मयंक यादवबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
स्टुअर्ट ब्रॉडला विश्वास आहे की, भारताचा नवा वेगवान गोलंदाज मयंक यादवला थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणले जाऊ शकते, जेणेकरुन त्याचे शरीर त्याच्या कारकिर्दीत दुखापतींना तोंड देण्यासाठी मजबूत करता येईल. मयंक यादव लहान वयात सुरुवात करून वरच्या स्तरावर बरेच काही शिकू शकतो, परंतु त्याला चढ-उतारांसाठी तयार राहावे लागेल, असंही स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला.
मला वाटत नाही की त्याला देशांतर्गत क्रिकेटमधून जाण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळून त्याचे शरीर आपोआपच कणखर होईल. मयंक यादवकडे रनअप चांगली आहे आणि त्याला लाईन आणि लेन्थची चांगली समज आहे. तरुण गोलंदाजासाठी वरच्या स्तरावर खेळणे हा एक चांगला धडा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लहान वयात सुरुवात करून मी खूप काही शिकलो. तो त्यापैकी एक आहे. आयपीएलमधील सर्वोत्तम फलंदाज विरुद्ध मयंक यादव शिकत आहे, असं स्टुअर्ट ब्रॉडने सांगितले.
भारताला एक खास गोलंदाज मिळाला-
इंग्लंडसाठी 604 कसोटी बळी घेतलेल्या ब्रॉडने सांगितले की, 21 वर्षीय मयंक यादवला वरच्या स्तरावर क्षेत्ररक्षण केल्याने त्याचा फायदा होईल, कारण भारताला एक खास गोलंदाज मिळाला आहे. तो म्हणाला, "मला त्याला भारतीय संघात बघायला आवडेल. तो खेळतो हे आवश्यक नाही पण ड्रेसिंग रूममध्ये तो खूप काही शिकू शकतो. भारताला एक खास खेळाडू मिळाला आहे, ज्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे."
मयंक यादवने स्वत:चाच मोडला विक्रम
21 वर्षीय मयंक यादव आपल्या पदार्पणाच्या सामन्यापासूनच खूप चर्चेत आहे. त्याने आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकला. आपल्या पहिल्या सामन्यात मयंकने पंजाब किंग्जविरुद्ध ताशी 155.8 किमी वेगाने चेंडू टाकला होता. आता मयंक यादवनेही हा विक्रम मोडला आहे. त्याच्या दुसऱ्या सामन्यात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 156.7 किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकला.
मयंक यादवला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत संधी द्या
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथनं देखील मयंक यादवच्या बॉलिंगसंदर्भात भाष्य केलं आहे. मयंक यादवला आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत संधी देण्यात यावी असं त्यानं म्हटलं आहे. मयंक यादवनं आयपीएलमधील दोन मॅचमध्ये सहा विकेट घेतल्या आहेत. मयंक यादवनं पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये पदार्पण केलं होतं. त्या मॅचमध्ये मयंकनं 3 विकेट घेतल्या. आरसीबी विरुद्धच्या मॅचमध्ये मयंक यादवनं 14 धावांमध्ये 3 विकेट घेत टीमला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार आणि कॅमेरुन ग्रीनची विकेट मयंक यादवने घेतली.