अहमदाबाद : आयपीएल (IPL 2024) मध्ये आज पंजाब किंग्जला (Punjab Kings) दुसरा विजय मिळाला आहे.  पंजाब किंग्जनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. शुभमन गिलच्या (Shubman Gill) 89 धावांच्या जोरावर गुजरातनं  (Gujarat Titans)  4 विकेटवर  199 धावा केल्या. पंजाब किंग्जनं शशांक सिंगच्या (Shashank Singh) अर्धशतकाच्या आणि इम्पॅक्ट प्लेअर आशुतोष शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर विजय मिळवला. शशांक सिंगनं पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. 


कोण आहे शशांक सिंग?


शशांक सिंग हा मूळचा छत्तीसगडचा खेळाडू आहे. आक्रमक फलंदाजीसाठी त्याची ओळख आहे. शशांक सिंग बॉलिंग देखील करु शकतो. आयपीएलच्या मिनी ऑक्शनच्या वेळी शशांक सिंगला संधी देण्यात कुठल्याही फ्रँचायजीनं पुढाकार घेतला नव्हता. पंजाब किंग्जनं शशांक सिंगला संघात घेतलं होतं मात्र काही कारणांमुळं त्यांना आपण चुकीच्या खेळाडूला संघात घेतल्याचं वाटलं होतं. काही काळानंतर गैरसमज दूर झाले आणि पंजाबनं शशांक सिंगला संघात घेतल्याचं जाहीर केलं होतं. 


शशांक सिंगची जाएंट किलर खेळी


पंजाब किंग्जकडून 61 धावांची खेळी करणाऱ्या शशांक सिंगला प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यात आली. शशांक सिंगनं 29 बॉलमध्ये 61 धावांची खेळी केली. शशांकनं 210 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. शशांकनं 3 षटकार आणि चार चौकार लगावत 61 धावा केल्या आणि पंजाबला विजयाजवळ पोहोचवलं. शशांकनं पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये क्रिकेटिंग शॉट खेळण्याचा सल्ला कोचनं दिल्याचं म्हटलं होतं. 


शशांक सिंगनं यापूर्वी आरसीबी विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये देखील जोरदार फटकेबाजी केली होती. शशांकनं आरसीबी विरुद्ध 8 बॉलमध्ये 21 केल्या होत्या.   


पंजाब किंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये दुसरा विजय मिळवला. जॉनी बेयरस्टोनं 22 धावा केल्या, याशिवाय प्रभासिमरन सिंगनं 35 , सिकंदर रझा 15, जितेश शर्मा 16 आणि आशुतोष शर्मानं 17 बॉलमध्ये 31 धावा केल्या आणि पंजाबच्या विजयात हातभार लावला. 


आशुतोष शर्माची खेळी गेमचेंजर


पंजाब किंग्जनं आजच्या मॅचमध्ये आशुतोष शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात स्थान दिलं होतं. जितेश शर्मा बाद झाल्यानंतर आशुतोष शर्मा मैदानात फलंदाजीसाठी उतरला. यावेळी त्यानं एक षटकार आणि तीन चौकारांच्या जोरावर 17 बॉलमध्ये 31 धावा केल्या. 


दरम्यान, आता पंजाब किंग्ज आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स सहाव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्ज 200 आणि त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग 6 वेळा करणारी एकमेव टीम ठरली आहे.


संबंधित बातम्या : 


IPL 2024, Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवचं मुंबईमध्ये कमबॅक कधी होणार? प्लेईंग इलेव्हनमधून कुणाला डच्चू मिळणार?


GT vs PBKS : आयपीएलमध्ये मोठा उलटफेर, पंजाबकडून गुजरातला पराभवाचा धक्का, होमग्राऊंडवर विजयाचं स्वप्न भंगलं