Shreyas Iyer IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा (Punjab Kings vs Mumbai Indians) पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. क्वालिफायर-2 च्या सामन्यात पंजाब किंग्सने 5 विकेट्सने विजय मिळवत तब्बल 11 वर्षांनी आयपीएलच्या अंतिम सामन्यात एन्ट्री मारली. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने 41 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी करून पंजाबच्या ऐतिहासिक विजयात मोठे योगदान दिले.
पंजाब किंग्सच्या विजयानंतर श्रेयस अय्यरची सध्या चर्चा रंगली आहे. क्वालिफायर-2 सारख्या सामन्यात समोर मुंबई इंडियन्सचा संघ आणि 204 धावांचं आव्हान असताना देखील श्रेयस अय्यर शांत आणि संयमी दिसला. श्रेयस अय्यरच्या या भूमिकेवरुन सर्वांना कॅप्टन कूल म्हणून ओळख असणाऱ्या एमएस धोनीची आठवण झाली. तसेच धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. मग ती भारतीय क्रिकेट संघासाठी असो की आयपीएलसाठी...तो नेहमीच धावांचा पाठलाग करताना पुढे राहिलेला दिसला. त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये 'चेस मास्टर' म्हणून नाव कमावलेल्या विराट कोहलीसारखाच श्रेयस अय्यर दिसून आला.
2024 मध्ये दुखावला, पुन्हा लिलावात उतरला-
मागील वर्षी 2024 च्या आयपीएलचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने पटकावले होते. यावेळी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर होता. मात्र या विजयाचे श्रेय पूर्णपणे मेंटॉर गौतम गंभीरला मिळाले. आपल्या कर्णधारपदाच्या जोरावर ज्याने कोलकाताला दहा वर्षांनी विजेतेपद मिळवून दिले तो कर्णधार श्रेयस अय्यर दुखावला गेला. त्यानंतर श्रेयस अय्यरने कोलकाताचा संघ सोडण्याचा निर्णय घेत पुन्हा आयपीएलच्या लिलावत उतरला. आयपीएलच्या लिलावात उतरताच श्रेयस अय्यर आयपीएलमधील सगळ्यात महागडा म्हणून दुसरा खेळाडू ठरला. आज त्याच श्रेयस अय्यरने 5 वेळ जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा संघाला पराभूत करुन पंजाबला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. मुंबईला पहिल्यांदाच 200 धावांचा बचाव याच श्रेयस अय्यरमुळे करता आला नाही. त्यामुळे सगळेच 'श्रेयस अय्यर मानलं तुला' असं म्हणत आहेत.
श्रेयस अय्यरने तीन संघांचं नेतृत्व केलं, तिन्ही संघांना फायनलमध्ये पोहचवले!
पंजाब किंग्सने 2014 मध्ये आतापर्यंतचा एकमेव आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबला 3 विकेट्सने पराभव केला होता. श्रेयस अय्यरला जादूगार म्हणा किंवा आणखी काही, त्याने 11 वर्षांनंतर अंतिम फेरीत खेळण्याचे पंजाबचे स्वप्न पूर्ण केले आहे. कर्णधार म्हणून 5 वर्षांत अय्यरचा हा आयपीएलचा तिसरा अंतिम सामना असेल. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने अय्यरच्या नेतृत्वाखाली 2020 चा अंतिम सामना खेळला होता. त्याचवेळी, कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 मध्ये ट्रॉफी जिंकली आणि आता पंजाबला अंतिम फेरीत पोहचवून क्षेयस अय्यरने इतिहास रचला आहे.