कोलकाता : आयपीएलमधील 47 (IPL 2024) व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) पराभूत केलं. कोलकातानं दिल्ली कॅपिटल्सवर 7 विकेटने विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील कोलकाताच्या टीमनं यंदाच्या स्पर्धेतील सहावी मॅच जिंकली. या मॅचनंतर टीमचा मालक अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी आक्रमक फलंदाज रिंकू सिंगला भारतीय टीममध्ये संधी मिळावी, अशी इच्छा शाहरुख खाननं व्यक्त केली. शाहरुख खाननं ही त्याची व्यक्तिगत इच्छा असल्याचं म्हटलं. रिंकू सिंग (Rinku Singh) गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्ये केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर प्रसिद्धीच्या झोतात आला होता. 


वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत 1 जूनपासून सुरु होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. भारताच्या 15 सदस्यीय टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी रिंकू सिंग प्रबळ दावेदार मानला जात आहे. रिंकू सिंगनं भारताकडून 15 टी-20 मॅचमध्ये 176 धावा केल्या आहेत. त्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. 


शाहरुख खान मॅच संपल्यानंतर स्टार स्पोर्टसशी बोलत होता. यावेळी त्यानं त्याची मन की बात सांगितली. तो म्हणाला की शानदार खेळाडू देशासाठी खेळत आहेत, मी रिुंकू सिंगसाठी उत्सूक आहे, इन्शाअल्लाह त्याला वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळावं त्यासह इतर संघांच्या युवा खेळाडूंना देखील संधी मिळावी, असं शाहरुख खान म्हणाला. 


शाहरुख खान म्हणाला की अनेक युवा खेळाडू दावेदार आहेत. मात्र, मला वैयक्तिक असं वाटतं रिंकू सिंगला संघात स्थान मिळावी, मला आनंद होईल, असं शाहरुख खान म्हणाला.     


टीम इंडियाच्या संघाची घोषणा कधी ?


आयसीसीच्या नियमानुसार टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या देशांना त्यांचे संघ 1 मे पर्यंत जाहीर करावे लागणार आहेत. न्यूझीलंडनं त्यांचा संघ जाहीर केलेला आहे. टीम इंडियाचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. रोहित शर्मा, अजित आगरकर आणि राहुल द्रविड यांच्यात रविवारी बैठक झालेली असून लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. टीम इंडियात रिंकू सिंगला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. रिंकू सिंगनं टी-20 मध्ये भारतासाठी आक्रमक फलंदाजी केली. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला कोलकाताची टॉप ऑर्डर चांगली खेळत असल्यानं बऱ्याचदा फलंदाजी करण्याची संधी मिळत नाही.


संबंधित बातम्या : 



दिल्लीच्या फलंदाजांचं लोटांगण, कुलदीप एकटाच भिडला, कोलकात्यासमोर 154 धावांचं आव्हान