Delhi Capitals vs Rajasthan Royals: अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2021 (IPL) व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव केला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा या मोसमात 10 सामन्यांत आठवा विजय आहे. या विजयासह दिल्लीने 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.


राजस्थानसाठी संजू सॅमसनने 53 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यांच्या व्यतिरिक्त फक्त महिपाल लोमरोर दुहेरी आकडा पार करू शकला. 155 धावा केल्यावर दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच राजस्थानच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले आणि नियमित अंतराने विकेट घेतल्या.


दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा खेळत 20 षटकांत 6 बाद 154 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सॅमसनच्या नाबाद 70 धावा असतानाही राजस्थान रॉयल्स संघ निर्धारित षटकांत सहा गडी बाद 121 धावाच करू शकला. या मोसमातील 9 सामन्यांमध्ये राजस्थानचा हा पाचवा पराभव आहे. यासह तो गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरला आहे.


राजस्थानकडून लियाम लिव्हिंगस्टोनने 01, यशस्वि जयस्वालने 05, डेव्हिड मिलरने 07, महिपाल लोमरोरने 19, आणि रियान परागने 02 धावा केल्या. यानंतर राहुल तेवतिया 15 चेंडूत कोणत्याही चौकाराशिवाय नऊच धावा करू शकला. कर्णधार संजू सॅमसनने 53 चेंडूत आठ चौकार आणि एका षटकारासह नाबाद 70 धावा केल्या.


दिल्लीसाठी एनरिक नॉर्टजेने आपल्या चार षटकांत अवघ्या 18 धावा देऊन दोन विकेट घेतल्या, तर आवेश खान, रविचंद्रन अश्विन, कागीसो रबाडा आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


DC vs RR: 10 वर्षानंतर दुसऱ्यांदा असं घडलं! राजस्थानच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद


तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणारा सलामीवीर शिखर धवन चौकाराच्या मदतीने आठ चेंडूंमध्ये केवळ आठ धावा करू शकला. त्याचबरोबर पृथ्वी शॉची बॅटही पुन्हा एकदा शांत राहिली. तो 12 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.


श्रेयस अय्यर आणि कर्णधार पंत यांनी दोन्ही सलामीवीर केवळ 21 धावांवर बाद झाल्यानंतर डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. अय्यरने 32 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. त्याचवेळी पंत 24 चेंडूत दोन चौकारांसह केवळ 24 धावा करू शकला.


दिल्ली चांगल्या स्थितीत आली अन् दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर शिमरॉन हेटमायरने राजस्थानच्या फलंदाजांवर हल्ले करायला सुरुवात केली. त्याने 16 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. मुस्तफिजुर रहमानने हेटमायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर अक्षर पटेल सात चेंडूत 12 धावा करून बाद झाला. मात्र, मार्कस स्टोइनिसच्या जागी संघात सामील झालेला ललित यादव 15 चेंडूत 14 धावांवर नाबाद परतला आणि आर अश्विनने सहा चेंडूत सहा धावा केल्या. दोघांनीही दिल्लीचा स्कोर 150 च्या पुढे नेला.


दुसरीकडे, राजस्थानकडून मुस्तफिजूर रहमानने शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत फक्त 22 धावा देऊन दोन बळी घेतले. याशिवाय चेतन साकरियाने 33 धावा देऊन दोन बळी घेतले. त्याचबरोबर कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.