RR vs RCB Live Score IPL 2024 Eliminator : राजस्थानच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. आरसीबीला 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 172 धावाच करता आल्या. आरसीबीकडून विराट कोहली 33, रजत पाटीदार 34 आणि महिपाल लोमरोर 32 यांनी छोटेखानी खेळी केली. एकाही फलंदाजाला अर्धशतक ठोकता आले नाही. राजस्थानकडून आवेश खान याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. राजस्थानला विजयासाठी 173 धावांचे आव्हान असेल. एलिमेनटर सामन्यातील विजेता संघ चेन्नईला क्वालिफायर 2 खेळण्यासाठी जाईल. त्यांचा सामना हैदराबादविरोधात होणार आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एलिमेनटर सामन्यात संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. पॉवरप्लेमध्ये ट्रेंट बोल्ट याने भेदक मारा केला. बोल्टने पहिल्या तीन षटकात फक्त सहा धावा देत विराट कोहली आणि फाफ यांना शांत ठेवले. पण विराटने दुसऱ्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी 37 धावांची भागिदारी केली. फाफ डू प्लेसिस याने 14 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि दोन चौकार ठोकले. विराट कोहली याने छोटेखानी खेळी करत आरसीबीचा डाव सावरला.
विराट कोहलीचे 33 धावांचं योगदान -
एलिमेटनरच्या सामन्यात विराट कोहलीने 33 धावांचे योगदान दिलं. गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. बोल्टच्या भेदक माऱ्याचा समर्थपणे सामना केल्यानंतर इतर गोलंदाजांचा समाचार घेतला. विराट कोहलीने 24 चेंडूमध्ये 33 धावांचे योगदान दिले. विराट कोहलीने आपल्या या छोटेखानी खेळीमध्ये एक षटकार आणि तीन चौकार ठोकले. विराट कोहलीने आरसीबीला चांगली सुरुवात करुन दिली.
ग्रीन-पाटीदारची छोटेखानी खेळी -
विराट कोहली अन् फाफ तंबूत परत्लयानंतर कॅमरुन ग्रीन आणि रजत पाटीदार यांनी डाव सावरला. दोघांनी चौफेर फटकेबाजी सुरु केली. कॅमरुन ग्रीन याने 21 चेंडूत 27 धावांचे योगदान दिले. ग्रीन धोकादायक होत होता, पण त्याचवेळी अश्विन याने त्याला जाळ्यात अडकवले. ग्रीनने आपल्या खेळीत एक षटकार आणि दोन चौकार ठोकले. दुसरीकडे रजत पाटीदार याने पिटाई सुरुच ठेवली, पाटीदार याने 22 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली, या खेळीमध्ये त्याने दोन षटकार आणि दोन चौकार ठोकले.
लोमरोरचा फिनिशिंग टच -
आरसीबीच्या फलंदाजांनी ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. त्यामुळे मोठी धावसंक्या उभारण्यात य़श आले नाही. ग्लेन मॅक्सवेल याला खातेही उघडता आले नाही. मॅक्सवेल याला अश्विन याने पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकच्या मदतीने धावसंख्या वाढवली. कार्तिक फक्त 11 धावा काढून बाद झाला. पण महिपाल लोमरोर याने 17 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने दोन षटकार आणि दोन चौकार ठोकले. महिपाल लोमरोर याने आरसीबीकडून सर्वाधिक वेगवान धावा जोडल्या. महिपाल लोमरोर याने 188 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. अखेरीस स्वप्नील सिंह आणि कर्ण शर्मा यांनी फटकेबाजी करत आरसीबीची धावसंख्या 170 पार पोहचवली.
राजस्थानची गोलंदाजी शानदार -
आवेश खान याने भेदक मारा केला, त्याने आरसीबीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. आर. अश्विन याने अचूक टप्प्यावर मारा करत धावसंख्या रोखली. अश्विनने फक्त 19 धावा खर्च करत दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. युजवेंद्र चहल याला एक विकेट मिळाली. ट्रेंट बोल्ट यानेही भेदक मारा केला. त्याने चार षटकात 16 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. संदीप शर्माला एक विकेट मिळाली.