Sunil Narine and Andre Russell dancing : आयपीएल 2024 मधील क्वालिफायर 1 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून फायनलमध्ये धडक मारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी खरोखरच कमाल केली. त्यांनी हैदराबादचा अख्खा डाव १५९ धावांत गुंडाळला. त्यामुळं कोलकात्यासमोर विजयासाठी केवळ १६० धावांचं आव्हान होतं. कोलकात्यानं तब्बल ३८ चेंडू आणि आठ विकेट्स राखून विजयी लक्ष्य गाठलं. वेंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यरची नाबाद अर्धशतकं कोलकात्याच्या विजयात निर्णायक ठरली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्याआधी, मिचेल स्टार्कनं तीन, तर वरुण चक्रवर्तीनं दोन विकेट्स काढून हैदराबादचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली होती. फायनलमध्ये धडक मारल्यानंतर कोलकात्याच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. मंगळवारी रात्री कोलकात्याची खेळाडूंनी पार्टी केली. डिस्कोमध्ये खेळाडूंनी जोरदार डान्स केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 


नारायण-रसेल डिस्कोमध्ये थिरकले, कॅरेबियन डान्स चर्चेत


कोलकाता फायनलमध्ये पोहचल्यानंतर मालक शाहरुख खान यानं नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांचं अभिवादन केले. हैदराबादचा पराभव केल्यानंतर कोलकात्याच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. आंद्रे रसेल आणि सुनील नारायण यांनी डिस्कोमध्ये जाऊन डान्स केला. मंगळवारी रात्री रसेल आणि नारायण डिस्कोच्या गाण्यावर थिरकले. दोघांचा कॅरेबियन डान्स सोशल मीडियावर चर्चेत आहे. 


पाहा व्हिडीओ






आयपीएल 2024 मध्ये सुनील नारायणचं प्रदर्शन


यंदाच्या हंगामात सुनिल नारायण यानं अष्टपैलू कामगिरी केली. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्यानं प्रभावी कामगिरी केली. सलामीला फलंदाजी करताना नारायण याने प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या चिंधड्या उडवल्या. त्याने 13 सामन्यात 166 च्या स्ट्राईक रेटने 482 धावा केल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 32 षटकार आणि 50 चौकार ठोकले. गोलंदाजी करताना नारायण याने 16 विकेट घेतल्या आहेत. 


आयपीएल 2024 मध्ये आंद्रे रसेलचं प्रदर्शन


कोलकाता नाइट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने यंदाच्या हंगामात शानदार प्रदर्शन केले आहे. रसेलने 13 सामन्यात 185 च्या स्ट्राईक रेटने 185 धावा केल्या आहेत. त्याने 16 विकेटही घेतल्या आहेत.