IPL 2023 Playoffs : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात पंजाब किंग्सचा चार गडी राखून पराभव केला. या विजयानंतर प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा कायम आहेत. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबने पाच गडी गमावून 187 धावा केल्या. त्यानंतर राजस्थान संघाने दोन चेंडू शिल्लक असताना सहा गडी गमावून लक्ष्य गाठलं. या विजयासह राजस्थानचा संघ 14 सामन्यांनंतर आता 14 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, तर पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. 


मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांकडेही प्रत्येकी 14 गुण आहेत. पण दोन्ही संघांचे प्रत्येकी एक-एक सामने शिल्लक आहेत. गुजरातचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. तर हैदराबाद, दिल्ली आणि पंजाब संघाचा विजेतेपदापर्यत पोहोचण्याचा प्रवास संपला आहे. कोलकाता संघ अद्याप प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे पण, संघाचा नेट रनरेट पाहता त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.


राजस्थान संघाने पंजाब विरोधात विजय मिळवला असला तरी, रॉयल्सचा प्लेऑफपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नाही. आता राजस्थान रॉयल्स संघाचं भविष्य मुंबई आणि बंगळुरु संघाच्या हातात आहे. राजस्थान संघ आता प्रार्थना करेल की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स संघ त्यांचे आगामी सामने मोठ्या फरकाने हरावेत. तरच राजस्थानला पुढे जाण्याची संधी मिळेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सने आपापले सामने जिंकल्यास राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.


आता आयपीएल 2023 मध्ये फक्त चार गट सामने शिल्लक आहेत. आज दिवसाच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. दुसऱ्या सामन्यात कोलकाता संघाचा सामना लखनौ संघासोबत होणार आहे. रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आणि त्यानंतर आरसीबी आणि गुजरात यांच्यात सामना रंगणार आहे.


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. गुजरात टायटन्सचे 13 सामन्यांत 18 गुण आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे 15-15 गुण आहेत. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स संघ अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. आरसीबी, राजस्थान आणि मुंबई संघाकडे प्रत्येकी 14-14 गुण आहेत.


कोलकाता नाईट रायडर्स सातव्या क्रमांकावर आहे. तर पंजाब किंग्स आठव्या क्रमांकावर आहे. याशिवाय शेवटच्या दोन स्थानांवर अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज संघाकडे प्रत्येकी 12-12 गुण आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सचे 10 गुण आणि सनरायझर्स हैदराबादचे 8 गुण आहेत.