RR vs DC, IPL 2023 : सांघिक कामगिरीच्या जोरावर राजस्थानने दिल्लीवर रॉयल विजय मिळवला. 200 धावांचा बचाव करताना राजस्थानने दिल्लीला 142 धावांवर रोखत 57 धावांनी विजय मिळवला. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे राजस्थानने विराट विजय मिळवला. दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव होय. या पराभवामुळे दिल्ली गुणतालिकेच्या तळाशी पोहचली आहे. राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 142 धावांपर्यंत मजल मारु शकली. 


पृथ्वी शॉ पुन्हा फेल - 


युवा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ याला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता येत नाही. सलग तीन सामन्यात पृथ्वी शॉ स्वस्तात तंबूत परतलाय. त्याला खातेही उघडता आले नाही. 200 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीची सुरुवातच खराब झाली. पृथ्वी शॉ आणि मनिष पांडे एकापाठोपाठ एक तंबूत परतले. दोघांनीही खाते उघडता आले नाही. 


दिल्लीची फलंदाजी ढासळली - 


राजस्थानच्या गोलंदाजीपुढे दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. डेविड वॉर्नर आणि ललित यादव यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. पृथ्वी शॉ आणि मनिष पांडे यांना खातेही उघडता आले नाही. तर रायली रुसो 14 धावा काढून तंबूत परतला. अक्षर पटेल आणि रोवमन पॉवेल यांनी प्रत्येकी दोन दोन धावांचे योगदान दिलेय. 


वॉर्नरची एकाकी झुंज - 


200 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला ठरावीक अंतराने धक्के बसले. फलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला डेविड वॉर्नर याने संयमी खेळी केली. वॉर्नर याने अर्धशतक झळकावले. पण त्याची खेळी खूप संथ होती. अर्धशतकासाठी वॉर्नरने 40 पेक्षा जास्त चेंडू घेतले. त्याला एकही षटकार मारता आला नाही.  55 चेंडूत 66 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने सात चौकार लगावले. 


ललीत यादवची भन्नाट फलंदाजी - 


एकीकडे फलंदाज येत जात होते अन् कर्णधार संथ खेळत होता, अशा कठीण परिस्थितीत तलीत यादव याने भन्नाट फलंदाजी केली. त्याने 24 चेंडूत 38 धावांचे योगदान दिलेय. ललीत यादव आणि वॉर्नर खेळत असताना दिल्ली आशा उंचावल्या होत्या. पण ट्रेंट बोल्ट याने यादवचा पत्ता कट केला. 


राजस्थानची भन्नाट गोलंदाजी - 


200 धावांचा बचाव करताना राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. ठरावीक अंतरावावर दिल्लीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. ट्रेंट बोल्ट याने चार षटकात तीन दिल्लीकरांना तंबूत पाठवले. आर अश्विन याने दोन विकेट घेतल्या. चहल याने एक विकेट घेतली. राजस्थानच्या गोलंदाजांनी ठरावीक अंतराने विकेट तर घेतल्याच.. पण धावगतीही वाढू दिली नाही. राजस्थानच्या गोलंदाजीपुढे दिल्लीची फलंदाजी ढासळली.  


दरम्यान, यशस्वी जायस्वालची दमदार सुरुवात, जोस बटलरची संयमी फलंदाजी आणि शिमरोन हेटमायरच्या फिनिशिंग टचच्या जोरावर राजस्थान रॉयलने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 199 धावा केल्या. यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी खेळी केली.  


यशस्वी जायस्वालचा स्वॅग - 


राजस्थानचा युवा सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल याने आज आक्रमक सुरुवात केली. जायस्वाल याने 31 चेंडूत 60 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 11 चौकार आणि एक षटाकर लगावला. यशस्वी जायस्वाल याने पहिल्याच षटकात पाच चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले होते. यशस्वी जायस्वाल याने धावांचा पाऊस पाडला. जायस्वाल आणि जोस बटलर याने दिल्लीच्या गोलंदाजांची पिटाई केली. 


राजस्थानची रॉयल सुरुवात - 


जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांनी राजस्थानला दमदार सलामी दिली. दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जायस्वाल फटकेबाजी करत असताना जोस बटलर संयमी फंलदाजी करत साथ देत होता. बटलर आणि यशस्वी यांनी 8.3 षटकात 98 धावांची भागिदारी केली. राजस्थानच्या मोठ्या धावसंख्येचा पाया या जोडीने रचला. 


चांगल्या सुरुवातीनंतर विकेट फेकल्या - 


यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांनी दमदार सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर राजस्थानने एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. एकवेळ राजस्थान 250 धावा करेल असे वाटत होते, पण त्याचवेळी राजस्थानने लागोपाठ तीन विकेट गमावल्या. यशस्वी जायस्वाल अर्धशतकानंतर बाद झाला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग स्वस्तात माघारी परतले. संजूला खातेही उघडता आले नाही. तर रियान पराग 7 धावा काढून बाद झाला. 


जोस बटलरचा झंझावात -


जोस बटलर याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. जायस्वाल चौकार षटकार मारत असताना बटलर दुसऱ्या टोकाला शांतपणे फलंदाजी करत होता. जोस बटलर याने अखेरच्या काही षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडला. जोस बटलर याने  शिमरोन हेटमायर याला साथीला घेत संघाची धावसंख्या वाढवली. जोस बटलर याने 51 चेंडूत 79 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 11 चौकार आणि एक षटकार लगावला. 


शिमरोनचा फिनिशिंग टच - 


शिमरोन हेटमायर याने अखेरच्या षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. हेटमायर याने अवघ्या 21 चेंडूत 39 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने चार षटकार आणि एक चौकार लगावला. हेटमायर याच्या झंझावाती खेळीच्या बळावर राजस्थान याने 199 धावांपर्यंत मजल मारली. ध्रुव जुरेल यानेही तीन चेंडूत 1 षटकार लगावत 8 धावांची खेळी केली.


दिल्लीच्या गोलंदाजांची पिटाई - 


राजस्थानच्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच हल्लाबोल केला. दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजांचा त्यांनी समाचार घेतला. पहिल्या षटकापासूनच चौकारांचा पाऊस पाडला. सुरुवातीला यशस्वी जायस्वाल याने फटकेबाजी केली. त्यानंतर मधल्या षटकात जोस बटलर याने आपले काम चोख बजावले आणि अखेरच्या षटकात हेटमायरने फिनिशिंग टच दिला.स  दिल्लीकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.. पण चार षटकात 36 धावा खर्च केल्या. खलील अहमद याने दोन षटकात 31 धावा खर्च केल्या. एनरिक नॉर्खिया यानेही जवळपास 12 च्या सरासरीने धावा दिल्या. अक्षर पटेल याने 38 धावा दिल्या. दिल्लीकडून कुलदीप यादव याने चांगली गोलंदाजी केली. त्याने चार षटकात 31 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.