SRH vs RCB, IPL 2024 : करो या मरोच्या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा 35 धावांनी पराभव केला. नऊ सामन्यात हा आरसीबीचा दुसरा विजय ठरलाय. आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 206 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल हैदराबादचा संघ 171 धावांपर्यंत मजल मारु शकला. आरसीबीसाठी रजत पाटीदार आणि विराट कोहीलनं अर्धशतकं ठोकली, तर स्वप्निल सिंह, कॅमरुन ग्रीन आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. हैदराबादकडून शाहबाद अहमद आणि पॅट कमिन्स यांनी लढा दिला. हैदराबादचा पराभव करत आरसीबीनं प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय.


आरसीबीचा महिनाभरानंतर विजय -


महिनाभरानंतर आरसीबीला आयपीएलमध्ये विजय मिळाला आहे. आरसीबीनं 25 मार्च रोजी पंजाब किंग्सचा पराभव केला होता. त्यानंतर आरसीबीला सलग सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आज, 25 एप्रिल रोजी आरसीबीने विजय मिळवलाय. करो या मरोच्या सामन्यात आरसीबीनं हैदराबादचा 35 धावांनी पराभव केला. 


हैदराबादची खराब सुरुवात - 


आरसीबीनं दिलेल्या 225 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अतिशय़ खराब झाली. हैदराबादचा अर्धा संघ 69 धावांत तंबूत परतला होता. ट्रेविस हेड फक्त 1 धाव काढून बाद झाला. एडन मार्करम सात धावा काढून तंबूत परतला. हेनिरक क्लासेन 7 आमि नितीश रेड्डी 13 धावा काढून बाद झाले. सलामी फलंदाज अभिषेक शर्मा यानं सुरुवातीला फटकेबाजी केली, पण यश दयालनं त्याचा अडथळा दूर केला. अभिषेक शर्मानं 13 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी केली. 


कमिन्स-शाहबाजचा लढा - 


आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी लढा दिला. पण इतर फलंदाजांकडून त्यांना साथ मिळाली नाही. अब्दुल समद फक्त दहा धावा काढून बाद झाला. भुवनेश्वर कुमारने 13 धावा केल्या. पॅट कमिन्स यानं जोरदार फटकेबाजी केली. कमिन्सने 15 चेंडूमध्ये तीन षटकाराच्या मदतीने 31 धावांचा पाऊस पाडला. तर शाहबाज अहमद अखेरपर्यत पाय रोवून उभा राहिला. त्यानं 37 चेंडूमध्ये 40 धावांचं योगदान दिले. 


आरसीबीची गोलंदाजी -


आरसीबीच्या गोलंदाजांनी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच भेदक मारा केला. आरसीबीकडून स्वप्निल सिंह, कर्ण शर्मा आणि कॅमरुन ग्रीन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. विल जॅक्स, यश दयाल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. मोहम्मद सिराजला विकेट मिळाली नाही, पण त्यानं चार षटकात फक्त 20 धावा खर्च केल्या.


विजय मिळाला, पण अद्याप तळालाच - 


आरसीबीने यंदाच्या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. आरसीबीच्या नावावर चार गुणांच नोंद झाली. नऊ सामन्यात सात पराभव आणि दोन पराभवासह आरसीबीचा संघ अद्याप दहाव्या स्थानावर विराजमान आहे. हैदराबादचा पराभव केल्यानंतर आरसीबीचं प्लेऑफमधील आव्हान जिवंत राहिलेय.