IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात रोहित शर्मा (Rohit Sharma) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतोच. आयपीएल 2024 सुरुवात (IPL 2024) होण्याआधी मुंबईने (MI) कर्णधारपद काढून घेतल्यामुळे रोहित शर्मा चर्चेत आला होता. पण आता रोहित शर्मा फलंदाजीमुळे चर्चेत आहे. कर्णधारपद गेल्याचा रोहितच्या फलंदाजीवर कोणताही फरक पडल्याचं दिसत नाही. रोहित शर्माची (Rohit Sharma) फलंदाजी अधिक चांगली झाल्याचं दिसतेय. रोहित शर्मा प्रत्येक गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत असल्याचं आकड्यावरुन दिसतेय. रोहित शर्मा यानं यंदाच्या हंगामात खोऱ्यानं धावा चोपल्या आहेत. मुंबईकडून सर्वाधिक धावा चोपणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मानं पॉवरप्लेमध्ये स्फोटक फलंदाजी करत मुंबईला वेगवान सुरुवात करुन दिली. मुंबईनं आकडे सहा संघावर भारी पडल्याचे दिसत आहेत. पाहूयात हिटमॅन शर्माचे यंदाच्या हंगामातील आकडे काय सांगतात...
रोहित शर्मानं यंदाच्या हंगामात सात सामन्यात 297 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये 30 चौकार आणि 18 षटकार ठोकले आहेत. रोहित शर्मा यंदाच्या हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. रोहित शर्मानं एखाद्या संघापेक्षा जास्त षटकार लगावले आहेत. रोहित शर्मानं यंदाच्या हंगामात पॉवरप्लेमध्ये 13 षटकार ठोकले आहेत. आयपीएल 2024 मध्ये फक्त राजस्थानविरोधात रोहित शर्माला पॉवरप्लेमध्ये षटकार मारता आला नाही, कारण तो शून्यावर बाद झाला होता.
कोणत्या संघाने यंदाच्या हंगामात पॉवरप्लेमध्ये किती षटकार ठोकले ?
यंदाच्या आयपीएल हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्मा आघाडीवर आहे. खेळाडू तर सोडा रोहितच्या आसपास काही संघही नाहीत. पॉवरप्लेमध्ये यंदा रोहित शर्माने 13 षटकार मारले आहेत. लखनौ सुपर जायंट्स संघानं पॉवरप्लेमध्ये 12 षटकार ठोकले आहेत. आरसीबी आणि चेन्नई संघानेही पॉरप्लेमध्ये 11-11 षटकार लगावले आहेत. गुजरात टायटन्स संघाने पॉवरप्लेमध्ये 10 षटकार ठोकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने सहा आणि पंजाब किंग्सने चार षटकार ठोकले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकारचा विक्रम -
विस्फोटक फंलदाजीमुळे रोहित शर्माला हिटमॅन म्हणून ओळखलं जातं. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय फलंदाजामध्ये रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मानं आयपीएलमध्ये 275 षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माच्या पुढे ख्रिस गेलचा क्रमांक लागतो, त्यानं 357 षटकार लगावले आहेत. भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचं झाल्यास रोहित शर्मानंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो. कोहलीने 248 षटकार ठोकले आहेत.
आणखी वाचा :
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर