नवी दिल्ली : आयपीएलमधील (IPL 2024) 40 वी लढत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात पार पडली. दिल्ली कॅपिटल्सनं अटतटीच्या लढतीत गुजरातवर 4 धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंत यानं 88 धावांची खेळी केली. रिषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीनं 20 ओव्हरमध्ये 4 बाद 224 धावा केल्या होत्या. गुजरातचा संघ 20 ओव्हरमध्ये 8 बाद 220 धावांपर्यंत पोहोचला. गुजरातला सलग दुसऱ्यांदा पराभूत करत दिल्लीनं गुणतालिकेत देखील मोठी झेप घेतली आहे. रिषभ पंतला त्याच्या कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. मॅच संपल्यानंतर रिषभ पंतनं एका गोष्टीसाठी माफी मागितली आहे. 


रिषभ पंतनं माफी का मागितली?


रिषभ पंतनं दिल्ली कॅपिटल्ससाठी 43 बॉलमध्ये 88 धावांची खेळी केली. यामध्ये त्यानं 8 सिक्स आणि 5 चौकार मारले. रिषभ पंतनं मारलेल्या एका सिक्सच्या वेळी बॉल कॅमेरामनला लागला. यामुळं तो कॅमेरामन जखमी झाला होता, रिषभ पंतनं त्याची माफी मागितली असून सॉरी म्हणत बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रिषभ पंतनं ज्यावेळी कॅमेरामनची माफी मागितली त्यावेळी दिल्लीचा कोच रिकी पाँटिंग देखील तिथं उपस्थित होता. 






दिल्लीचा गुजरातला पुन्हा धक्का


दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा पराभूत केलं आहे. दिल्ली आणि गुजरातमध्ये यापूर्वी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच झाली होती. गुजरात टायटन्सला दिल्लीनं 89 धावांवर रोखलं होतं. त्यानंतर दिल्लीनं सहा विकेटनं विजय मिळवला होता. 


दिल्ली कॅपिटल्सनं केलेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी गुजरात टायटन्सकडे होती. गुजरातनं अखेरच्या ओव्हरपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना विजय मिळवण्यात यश आलं नाही. 


दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 4 विकेटवर 224 धावा केल्या होत्या. रिषभ पंतनं 43 बॉलमध्ये 8 षटकार आणि पाच चौकारांसह 88 धावा केल्या होत्या. रिषभ पंतला अक्षर पटेलनं साथ दिली. अक्षर पटेलनं चार सिक्स आणि पाच चौकारांसह 66 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सनं 7 बॉलमध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांसह 26 धावा केल्या होत्या.  


गुजरात टायटन्सनं 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 220 धावा केल्या होत्या. शुभमन गिल चांगली कामगिरी करु शकला नाही. गुजरात टायटन्सनंला 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. साई सुदर्शननं 39 बॉलमध्ये 65 धावांची खेळी केली. तर, डेव्हिड मिलरनं 23 बॉलमध्ये 3 षटकार आणि 6 चौकारांच्या साथीनं 55 धावांची खेळी केली. राशिद खाननं देखील अखेरीस फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला मात्र संघाला जिंकवून देण्यात त्याला यश आलं नाही. 


संबंधित बातम्या : 


Video : जसा गुरु तसा शिष्य, रिषभ पंतचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडीओ


IPL 2024 Points Table : दिल्लीचं विजयाच्या मार्गावर कमबॅक, रिषभ पंतच्या टीमनं गुजरातला लोळवलं, गुणतालिकेत मोठी झेप