IPL 2024 DC vs GT नवी दिल्ली : रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals)अटीतटीच्या लढतीत गुजरात टायटन्सवर (Gujarat Titans) पुन्हा एकदा विजय मिळवला. दिल्लीनं गुजरातला 4 धावांनी पराभूत केलं. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील टीमनं होम ग्राऊंडवर पहिला आणि यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2024) चौथा विजय मिळवला. दिल्लीच्या या विजयामुळं गुणतालिकेत देखील मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळालं. 


रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 224 धावा केल्या. यानंतर मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या गुजरात टायटन्सला 220 धावा करता आल्या. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या थरारक मॅचमध्ये अखेर दिल्ली कपिटल्सनं बाजी मारली.


दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 4 विकेटवर 224 धावा केल्या होत्या. कॅप्टन रिषभ पंत आणि अक्षर पटेलनं धडाकेबाज खेळी करत अर्धशतकी खेळी केली. रिषभ पंतनं 43 बॉलवर 88  धावा केल्या. यामध्ये रिषभनं 8 षटकार आणि 5 चौकार मारले. रिषभनं यातील चार षटकार आणि एक चौकार शेवटच्या ओव्हरमध्ये मारले. तर, अक्षर पटेलनं देखील 43 बॉलमध्ये 66 धावा करुन दिल्लीचा डाव सावरला. अखेरच्या टप्प्यात फलंदाजीला आलेल्या ट्रिस्टन स्टब्स यानं 7 बॉलमध्ये 26 धावा केल्या. गुजरातकडून संदीप वॉरिअरनं दिल्ली कॅपिटल्सला धक्के दिले होते. त्यानं दिल्लीचे तीन प्रमुख फलंदाज बाद केले होते. दिल्लीची 3 बाद 44 धावा अशी अवस्था झालेली असताना यानंतर रिषभ पंत आणि  अक्षर पटेलनं 113 धावांची भागिदारी केली. 


गुजरातचा अखेरच्या ओव्हरमध्ये पराभव


गुजरात टायटन्सनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विजयासाठी अखेरच्या ओव्हरपर्यंत प्रयत्न केले. शुभमन गिल चांगली कामगिरी करु शकला नाही. तो केवळ 6 धावांवर बाद झाला. रिद्धिमान साहानं 39 धावा केल्या. यानंतर गुजरातचा डाव साई सुदर्शन यानं 39 बॉलमध्ये 65 आणि डेविड मिलर यानं 23 बॉलमध्ये 55 धावा केल्या. राशिद खाननं 11 बॉलमध्ये 21 धावा केल्या. मात्र, गुजरातला तो विजय मिळवून देऊ शकला नाही. 


दिल्लीची गुणतालिकेत मोठी झेप


रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्सनं आतापर्यंत 9 मॅच खेळल्या असून चार मॅच जिंकल्या असून पाच मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. गुजरातला पराभूत करत दिल्लीनं 8 गुणांसह मोठी झेप घेतली आहे. दिल्लीचा संघ आठव्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. दिल्लीला प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवायचा असल्यास त्यांना कोणत्याही परिस्थितीत राहिलेल्या मॅचेसमध्ये विजय मिळवावा लागेल. गुजरातची टीम 7 क्रमांकावर पोहोचली आहे. या विजयासह दिल्लीनं गुजरातसह मुंबईला देखील धक्का दिला आहे. मुंबई इंडियन्स आता आठव्या स्थानावर आहे.  


गुणतालिकेत कोण कुठल्या स्थानावर 


राजस्थान रॉयल्स चा संघ 14 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी 8 पैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवला आहे.कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 7 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जाएंटस यांच्याकडे देखील 10 गुण असून नेट रनरेटच्या आधारे ते तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. 
  
दिल्ली कॅपिटल्सचा संघ 8 गुणांसह सहाव्या, गुजरात 8 गुणांसह सातव्या, मुंबई 6 गुणांसह आठव्या पंजाब किंग्ज 4 गुणांसह नवव्या तर आरसीबी 2 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. 


संबंधित बातम्या :


 VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग


DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव