Tristan Stubbs Fielding नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) आयपीएलमध्ये काल झालेल्या 40 व्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सवर (Gujarat Titans)विजय मिळवत खळबळ उडवून दिली. आयपीएलच्या सुरुवातीला खराब कामगिरी करणाऱ्या दिल्लीनं जोरदार कमबॅक केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सला 4 धावांनी पराभूत केलं. दिल्लीला अटतटीच्या लढतीत विजय मिळाला यामध्ये ट्रिस्टन स्टब्सची (Tristan Stubbs)कामगिरी महत्त्वाची ठरली. स्टब्सनं 19 व्या ओव्हरमध्ये बाऊंड्रीवर जोरदार फिल्डिंग करत पाच रन वाचवल्या होत्या आणि दिल्लीनं चार धावांनी मॅच जिंकली. यामुळं दिल्लीच्या चाहत्यांनी विजयाचं श्रेय ट्रिस्टन स्टब्सला दिलं.ट्रिस्टन स्टब्सच्या फिल्डिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
   


दिल्लीचा कॅप्टन रिषभ पंत यानं 19 वी ओव्हर रसिख सलाम याला दिली होती. रसिख सलामनं राशिद खानला स्लोअर बॉल टाकला होता. या बॉलला राशिद खाननं लाँग ऑफला शॉट मारला होता. सर्वांना वाटलं होतं हा शॉट षटकार ठरेल. मात्र, ट्रिस्टन स्टब्सनं अचानक एंट्री करत हवेत उडी मारुन बॉल रोखला यामुळं गुजरातला जिथं सहा धावा मिळणार होत्या तिथं एक रन मिळाली.






स्टब्सनं केलेल्या या कामगिरीचा फायदा दिल्ली कॅपिटल्सला झाला. हा सर्व प्रकार 19 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर घडला. ट्रिस्टन स्टब्सनं हवेत उडी मारुन बॉल बाऊंड्रीच्या पार जाण्यापासून रोखला होता. त्यानं बॉल अडवून ग्राऊंडवर टाकला आणि तो स्वत : बाऊंड्रीच्या आत  पडला. मात्र, यामुळं गुजरातला जिथं सहा धावा मिळणार होत्या.तिथं केवळ एक धाव मिळाली.  


अटीतटीच्या लढतीत दिल्लीचा विजय   


राजधानी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 4 बाद 224 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून रिषभ पंत आणि अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स यांनी चांगली फलंदाजी केली. रिषभ पंतनं 8 षटकार आणि पाच चौकारांसह नाबाद 88 धावा केल्या होत्या. तर, अक्षर पटेलनं 5 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 66 धावा केल्या होत्या. तर, ट्रिस्टनं स्टब्सनं 7 बॉलमध्ये 2 षटकार आणि 3 चौकार मारत 26 धावा केल्या.  


गुजरात टायटन्सचा पराभव


दिल्ली कॅपिटल्सनं होम ग्राऊंडवर पहिला विजय मिळवला. शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्सकडे दिल्लीनं केलेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी होती. मात्र, गुजरातला विजय मिळवण्यात अपयश आलं. ते 20 ओव्हरमध्ये 220 धावा करु शकले. गुजरातकडून साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर यांनी चांगली फलंदाजी केली. साई सुदर्शननं 39 बॉलमध्ये 2  षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीनं 65 धावा केल्या. मात्र, त्याची कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.  


संबंधित बातम्या : 


Video : जसा गुरु तसा शिष्य, रिषभ पंतचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडीओ


IPL 2024 Points Table : दिल्लीचं विजयाच्या मार्गावर कमबॅक, रिषभ पंतच्या टीमनं गुजरातला लोळवलं, गुणतालिकेत मोठी झेप