RCB vs PBKS IPL 2025 Final: आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीसाठी दोन संघ निश्चित झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जचा पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर आता पंजाब किंग्जने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (RCB vs PBKS IPL 2025 Final) यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात येईल. आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाईल. आज अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडला, तर आयपीएलची ट्रॉफी कोणाला मिळणार, याची सध्या चर्चा रंगली आहे. 

Continues below advertisement

पंजाब किंग्स आणि आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते, दोघांमध्ये खेळलेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीने पंजाबचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर पंजाब आणि मुंबईचा क्वालिफायर-2 सामना खेळण्यात आला. या सामन्यात पंजाबने 5 विकेट्सने विजय मिळवला. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पावसामुळे सामना सुमारे 2 तास उशिराने सुरू झाला, त्यामुळे सामना रद्द करावा लागेल असे वाटत होते. कारण या सामन्यात राखीव दिवस नव्हता आणि जर सामना रद्द झाला तर पंजाब किंग्जला न खेळता अंतिम फेरीचे तिकीट मिळाले असते. कारण ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर होते, पण जर अंतिम फेरीत असे झाले तर ट्रॉफी कोणाला मिळेल?, याची माहिती समोर आली आहे. 

आज अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता-

आज नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यावर पावसाचा परिणाम होईल. आज 20 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी पावसाची शक्यता जास्त आहे आणि सामन्यादरम्यानही पाऊस खेळात व्यत्यय आणू शकतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या अंतिम फेरीत राखीव दिवस आहे. जर पावसामुळे सामना थांबला किंवा सुरू होऊ शकला नाही, तर सामना 4 जून रोजी खेळवला जाईल. राखीव दिवशी देखील म्हणजेच 4 जून रोजी देखील पावसामुळे सामना न होऊ शकल्यास गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या संघाला विजय घोषित केले जाईल. म्हणजेच पंजाब किंग्सला आयपीएल 2025 ची ट्रॉफी मिळेल.

आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयचे नियम काय आहेत?

पावसामुळे आयपीएलच्या अंतिम सामन्यात अडथळा निर्माण झाला तर त्यासाठी 120 मिनिटे किंवा सुमारे दोन तासांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. म्हणजेच, जर थोडा वेळ पाऊस पडला तर सामना पूर्ण 20 षटकांचा खेळवण्यात येईल. त्यानंतरही, जर पाऊस सुरूच राहिला तर षटक कमी केले जातील. बीसीसीआय किमान 5 षटकांचा सामना आयोजित करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून जो संघ चांगला खेळेल तो विजेता होईल. तसेच पाऊस सुरुच राहिल्यास राखीव दिवशी सामना खेळवण्यात येईल. मात्र राखीव दिवशी देखील पावसाने सामन्यात खोळंबा केल्यास गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या संघाला विजय घोषित केले जाईल. 

संबंधित बातमी:

MI vs PBKS IPL 2025: स्वप्नभंग होताच हार्दिक कोसळला, नीता अंबानी कपाळाला हात लावून बसल्या; रोहित शर्माचा फोटो पाहून चाहते हळहळले

PBKS vs MI IPL 2025: नेहाल वढेराचा आधी झेल सोडला, मग 17 व्या षटकांत पंजाबने धू धू धुतला, मुंबईचा 'हा' खेळाडू व्हिलन ठरला!