IPL 2021 : सध्या देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. अशातच कोरोनाच्या सावटात देशात आयपीएल खेळवण्यात येत आहे. अशातच यंदाच्या मोसमात शानदार सुरुवात करणाऱ्या दिल्लीच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून माघार घेतली आहे. अश्विनने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे. अश्विन म्हणाला की, "माझं कुटुंब सध्या कोरोनाशी झुंज देत आहे आणि अशा कठीण प्रसंगी मला त्यांच्यासोबत असणं गरजेचं आहे." कालच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर अश्विनने यासंदर्भात माहिती दिली. 



अश्विनने कालच्या सामन्यानंतर ट्वीट केलं की, "मी उद्यापासून यंदाच्या आयपीएलमधून माघार घेत आहे. माझं कुटुंब कोविड-19 शी झुंज देत आहे. अशा संकटकाळात माझं त्यांच्यासोबत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर भविष्यात परिस्थिती सामान्य झाली तर मी मैदानात वापसी करण्याबाबत विचार करु शकतो. धन्यवाद." 


महामारी विरुद्धच्या लढ्यात मदत करणार : अश्विन 


यापूर्वी 23 एप्रिल रोजी आपल्या एका ट्वीटमध्ये आर. अश्विनने म्हटलं होतं की, सध्या कोरोना व्हायरसच्या महामारीशी लढा देणाऱ्या लोकांना शक्य तेवढी मदत करणार आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "मी सर्वांना सांगू इच्छितो की, हा व्हायरस कोणालाही सोडत नाही आणि या लढाईत मी तुम्हा सर्वांसोबत आहे. जर तुमच्यापैकी कोणालाही या लढाईत माझी गरज असेल तर मला नक्की सांगा. मला जेवढं शक्य आहे तेवढी मदत मी नक्की करेल."



आणखी एका ट्वीटमध्ये अश्विन म्हणाला की, "माझ्या देशात सध्या जी परिस्थिती आहे, ती पाहून मन खरंच दुःखी झालं आहे. मी हेल्थकेअर क्षेत्राशी जोडलेलो नाही, परंतु, या कठिण प्रसंगी जे-जे आपलं कर्तव्य बजावत आहेत, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मी सर्व देशावासियांना आवाहन करतो की, या काळात काळजी घ्या आणि सुरक्षित राहा."


रोमांचक सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा हैदराबादवर 'सुप्पर' विजय, शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस


चेन्नईत सुरु असलेला दिल्ली आणि हैदराबादमध्ये झालेल्या रोमांचक सामना टाय झाला. त्यानंतर झालेल्या सुपरओव्हरमध्ये हैदराबादवर मात केली. सुपरओव्हरमध्ये हैदराबादनं दिल्लीसमोर सहा चेंडूत 8 धावांचं आव्हान दिलं होतं. सुपरओव्हरमध्ये हैदराबादच्या केन विल्यमसन आणि डेव्हिड वॉर्नरला केवळ सातच धावा करता आल्या. दिल्लीच्या शिखर धवन आणि ऋषभ पंत यांनी हे आव्हान सहा चेंडूत पूर्ण करत विजय साजरा केला. सुपर ओव्हर देखील रोमांचक झाली. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला.  या विजयासह दिल्ली गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Video | विजय शंकरची 'गगनभेदी' गोलंदाजी पाहून ब्रेट लीसुद्धा हैराण