CSK IPL 2022 : रवींद्र जाडेजाने चेन्नई सुपरकिंग्सचे कर्णधारपद सोडले आहे. चेन्नईची धुरा पुन्हा एकदा एमएस धोनीकडे सोपण्यात आली आहे. चेन्नईने आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावर याची माहिती दिली आहे. आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी रवींद्र जाडेजाने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जाडेजाने धोनीला कर्णधारपद घेण्याची विनंती केली होती. धोनीने कर्णधारपद स्वीकारले आहे. धोनीने कर्णधारपद सांभाळताना रवींद्र जाडेजाला आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा मोलाचा सल्लाही दिलाय. (Ravi Jadeja hand over the captaincy of CSK to MS Dhoni.)


आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या आधी एमएस धोनीने चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. चेन्नईने रविंद्र जाडेजाकडे कर्णधारपद दिले होते. पण आयपीएलमध्ये जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईची कामगिरी खराब झाली. चेन्नईला आठ सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आले. सहा पराभव झाल्यामुळे चार गुणांसह चेन्नईचा संघ सध्या नवव्या क्रमांकावर आहे. चेन्नईचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचं आव्हान खडतर झालेय. उर्वरित एकाही सामन्यात चेन्नईचा पराभव झाल्यास प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात येऊ शकते. संघाची कामगिरी ढासळलीच, त्याशिवाय रवींद्र जाडेजाची कामगिरीही खराब झाली होती. जाडेजाला फलंदाजी आणि गोलंदाजीत अपयश येत होते. जाडेजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. कर्णधार असताना जाडेजाच्या खेळावरही परिणाम झाला होता. जाडेजाला आठ सामन्यात फक्त 112 धावाच काढता आल्या. त्याशिवाय गोलंदाजीही प्रभावी झाली नाही. आठ सामन्यात जाडेजाला पाच विकेट घेता आल्यात.  त्यामुळेच जाडेजाने खेळावर लक्ष केंद्रीत कऱण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या हंगामात धोनी चेन्नईचे कर्णधारपद सांभाळेल. रविवारी चेन्नईचा संघ धोनीच्या नेतृत्वाखाली हैदराबादविरोधात दोन हात करण्यासाठी मैदानात उतरले. 






 


हे देखील वाचा-