IPL 2024 : संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांच्या रॉयल अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने लखनौचा 7 विकेटने पराभव केला. लखनौने दिलेले 197 धावांच्या आव्हानाचा राजस्थानने एक षटक आणि सात विकेट राखून सहज पार केले. लखनौने 19 षटकांमध्ये तीन विकेटच्या मोबदल्यात 199 धावा केल्या. राजस्थानचा यंदाच्या हंगामातील हा आठवा विजय ठरला. या विजयासह राजस्थान संघानं प्लेऑफमधील आपलं स्थान जवळपास निश्चित केले आहे.
संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी शानदार फलंदाजी करत राजस्थानला एकतर्फी विजय मिळवून दिला. संजू सॅमसन यानं 33 चेंडूमध्ये 71 धावांची झंझावती खेळी केली. तर ध्रुव जुरेल यानं 34 चेंडूमध्ये 52 धावांचं योगदान दिलं. संजू सॅमसन यानं 215 च्या स्ट्राईक रेटने लखनौच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. संजू सॅमसन यानं आपल्या खेळीमध्ये चार षटकार आणि सात चौकाऱ ठोकले. तर ध्रुव जुरेल यानं आपल्या खेळीमध्ये दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी नाबाद शतकी भागिदारी करत राजस्थानला रॉयल विजय मिळवून दिला.
लखनौनं दिलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने आक्रमक सुरुवात केली. जयस्वाल आणि बटलर यांनी लखनौच्या गोलंदाजांचा खरपूस समचार घेतला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. पण 60 धावांवर राजस्थानला लागोपाठ दोन धक्के बसले. दोन्ही सलामी फलंदाज तंबूत परतले. यशस्वी जायस्वाल यानं 18 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. तर जोस बटलर यानं 18 चेंडूमध्ये 34 धावांचं योगदान दिलं. यामध्ये एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. दोन विकेट लागोपाट पडल्यानंतर रियान परागसोबत संजूनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण रियान पराग 14 धावा काढून बाद झाला. रियान पराग यानं 11 चेंडूमध्ये एका षटकाराच्या मदतीने 14 धावा केल्या.
संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी शतकी भागिदारी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. केएल राहुलचं नेतृत्व आज सामान्य दिसलं. स्टॉयनिसनं पहिल्या षटकात विकेट घेतली. त्यानं फक्त तीन धावा दिल्या. पण त्याला पुन्हा गोलंदाजी दिलीच नाही. त्याशिवाय अमित मिश्रा चांगली गोलंदाजी करत होता, त्यालाही गोलंदाजी दिली नाही. रवि बिश्नोई याला फक्त एकच षटक दिलं, पण तेही 15 षटकानंतर.. त्यामुळे राजस्थानच्या विजयात राहुलच्या नेतृत्वाचाही वाटा राहिला.