IPL 2023, Qualifier 1 - CSK Vs GT : धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात यांच्यामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार हे आता निश्चित झालेय. गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौला दुसऱ्या क्रमांकावर पोहचण्यासाठी कोलकात्यावर 97 धावांनी विजय मिळवायचा होता. पण लखनौला यामध्ये अपयश आले. त्यामुळे आता चेन्नई आणि गुजरात या संघामध्ये क्वालिफाय एक चा सामना होणार आहे. गुजरातने सलग दुसऱ्यावर्षी प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर चेन्नईने आतापर्यंत सर्वाधिकवेळा क्वालिफाय केलेय.
23 मे 2023 रोजी चेपॉक स्टेडिअमवर गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये क्वालियाफाय 1 सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे. चेन्नई घरच्या मैदानावर हार्दिक पांड्यासोबत दोन हात करणार आहे. यामधील विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेला संघ ELIMINATOR मधील विजेत्या संघासोबत दोन हात करेल.
चेन्नई संघाची ताकद काय?
अष्टपैलू खेळाडूंचा भरणा हीच या संघाची सर्वात मोठी ताकद होय.. त्याशिवाय कर्णधार धोनीचे नेतृत्वही जमेची बाजू आहे. चेपॉकवरील संथ खेळपट्टीवर धोनी गोलंदाजांचा अचूक वापर करतो.. रविंद्र जाडेजा, मोईन अली यांच्याशिवाय शिवम दुबे आणि दीपक चाहर हे अष्टपैलू खेळाडू संघासाठी फायदेशीर ठरतील. त्याशिवाय डेवोन कोनवे आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामी संघाची जमेची बाजू आहे. दोघांनी आतापर्यंत धावांचा पाऊस पाडलाय. अजिंक्य रहाणे आणि शिवब दुबे यांनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे.
गुजरातसाठी जमेची बाजू काय?
यंदाचा गुजरात संघ गेल्यावर्षीपेक्षा मजबूत दिसत आहे. हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाचा अनुभव आहे. त्याशिवाय तो आता अन स्विंग गोलंदाजीही करत आहे. त्याशिवाय शुभमन गिल सध्या लयीत आहे. राशिद खान याने नुकतेच दमदार कामगिरी केली आहे. डाव्या आणि उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंचे योग्य ते संतुलन आहे. हार्दिक आणि अन्य अष्टपैलू खेळाडूमध्ये संघ संतुलीत दिसत आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. मोहम्मद शमी आणि राशिद खान सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात आघाडीवर आहेत.