CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्सला पंजाब किंग्सने सात विकेटन पराभवाचा झटका दिला आहे. चेन्नईने दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पंजाबने सहज पाठलाग केला. पंजाबने 13 चेंडू आणि सात विकेट राखून चेन्नईचा पराभव केला. पंजाबकडून रायली रुसो आणि जॉनी बेयरस्टो यांनी झंझावती फलंदाजी केली.
पंजाबने दहा सामन्यात चौथ्या विजयाची नोंद केली. पंजाबचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. पंजाबच्या संघाला प्लेऑफसाठी उर्वरित सामन्यात विजय गरजेचा आहे. चेन्नईचा दहा सामन्यातील पाचवा पराभव झाला. चेन्नईचा संघ दहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
पंजाबची खराब सुरुवात, पण...
चेन्नईनं दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज प्रभसिमरन इम्पॅक्ट पाडण्यात अपयशी ठरला. प्रभसिमरन 13 धावा काढून बाद जाला. त्यानं दहा चेंडूमध्ये एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 13 धावांची खेळी केली. प्रभसिमरन बाद झाल्यानंतर पंजाबसाठी रायली रुसो आणि जॉनी बेयरस्टो यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी अर्धशतकी भागिदारी करत पंजाबची धावसंख्या वाढवली.
पंजाबच्या विजयाचा पाया रचला -
जॉनी बेयरस्टो आणि रायली रुसो यांनी दुसऱ्या विकेटसाठी 37 चेंडूमधये 64 धावांची भागिदारी केली. या भागिदारीमुळेच पंजाबच्या विजयाचा पाया रचला गेला. दुर्देवीरित्या दोघांचेही अर्धशतक हुकले. जॉनी बेयरस्टो यानं 30 चेंडूमध्ये 46 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि सात चौकारांचा समावेश राहिला. तर रायली रुसो यानं 23 चेंडूमध्ये 43 धावांची वादळी खेळी केली. या खळीमध्ये त्यानं दोन खणखणीत षटकार लगावले, तर पाच चौकारांचा साज दिला. पंजाबसाठी ही भागिदारी सर्वात मोठी राहिली.
विजयावर शिक्कामोर्तब -
रायली रुसो आणि जॉनी बेयरस्टो यांनी शानदार फलंदाजी करत पाया रचल्यानंतर शशांक सिंह आणि सॅम करन यांनी पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सॅम करन यानं नाबाद 25 धावांची खेळी केली तर शशांक सिंह यानं नाबाद 26 धावांचं योगदान दिलं.
दीपक चाहरच्या दुखापतीचा चेन्नईला फटका -
पहिलं षटक टाकणाऱ्या दीपक चाहर याला दुखापत झाली, त्यामुळे दोन चेंडू टाकल्यानंतर त्याला माघारी परतावे लागले. परिणामी याचा फटका चेन्नईला बसला. चेन्नईकडून शार्दूल ठाकूर यानं महागडी गोलंदाजी केली. त्यानं 3.4 षटकात 48 धावा खर्च केल्या. त्याला एक विकेट मिळाली. रिचर्ड ग्लेसन यानं 30 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. शिवम दुबे यालाही एक विकेट मिळाली. रवींद्र जाडेजा आणि मोईन अली यांना एकही विकेट मिळाली नाही.