Sanju Samson's Viral Malayalam Post : आगामी टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे. विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याला 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आलेय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. 2 जूनपासून टी20 विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. मंगळावारी बीसीसीआयकडून टीम इंडियाची निवड करण्यात आली. यामध्ये संजू सॅमसन याला संधी देण्यात आली. मागील काही दिवसांपासून संजू सॅमसन याला डावलण्यात येत होतं. पण अखेर त्याला विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आलं. विश्वचषकाचं तिकिट मिळाल्यानंतर संजू सॅमसन यानं खास शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. संजू सॅमसन याचं दोन शब्दाचं ट्वीट सध्या चर्चेचा विषय आहे. 


टी20 वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळाल्यानंतर संजू सॅमसन यानं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. संजू सॅमसन यानं मातृभाषेत ट्वीट केलेय. संजू सॅमसन यानं मल्याळमध्ये लिहिलेय की, "वियारपू थुनियट्टा कुप्पयम".. म्हणजेच याचा अर्थ 'घाम गाळून आणि मेहनत करून जर्सी शिवली'... संजू सॅमसनची पोस्ट अनेकांच्या मनाला भिडणारी आहे. संजू सॅमसन यानं टीम इंडियाच्या जर्सीमध्ये फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत खास लिहिलेल्या दोन शब्दाची चर्चा सुरु आहे. या पोस्टला 17 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. त्याशिवाय नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षावही होत आहे. 






संजू सॅमसनचं टी20 करियर


2015 मध्ये संजू सॅमसन यानं झिम्बाब्वेविरोधात भारतीय टी20 संघात परार्पण केले होते. त्यानं आतापर्यंत 25 टी 20 सामने भारतासाठी खेळले आहेत. यामधील 22 डावात त्यानं 19 च्या सरासरीने आमि 134 च्या स्ट्राईक रेटने 374 धावा केल्या आहेत. यामध्ये फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 77 इतकी आहे.


संजू सॅमसनचं आयपीएल करियर  


आयपीएलमध्ये संजू सॅमसन यानं दमदार कामगिरी केली आहे. संजू सॅमसन यानं आयपीएलमध्ये 161 सामने खेळले आहेत. संजू सॅमसन यानं 31 च्या सरासरीने आणि 140 च्या स्ट्राईक रेटने 4273 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये तीन शतकांचा आणि 24 अर्धशतकाचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 119 इतकी आहे. संजू सॅमसन यानं आयपीएलमध्ये 199 षटकार आणि 340 चौकार ठोकले आहेत. 


टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाचं वेळापत्रक


जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी ग्रुप अ मध्ये ठेवलं आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे. नऊ जून रोजी भारत आपल्या पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात भिडणार आहे. भारताचा तिसरा सामना 12 जून रोजी अमेरिकाविरोधात होणार आहे. तर अखेरचा सामना 15 जून रोजी कॅनडाविरोधात होईल. 


टी20 वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मो. सिराज.


राखीव : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि अवेश खान.