IPL 2024 : देशात यंदा सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, तरीही आयपीएल स्पर्धा भारतातच (IPL) रंगणार असल्याचे लीगचे अध्यक्ष अरुण धुमळ (Arun Dhumal) यांनी सांगितलं. आयपीएल 2024 (IPL 2024) हा हंगाम 22 मार्चपासून सुरु होणार असल्याचं अरुण धुमाळ यांनी मंगळवारी सांगितलं. यावेळी देशात लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. हे लक्षात घेऊन ही तारीख ठरवल्याचेही धुमाळ म्हणाले.
देशात यंदा लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्याचवेळी आयपीएलचा थरारही होणार आहे. 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात करण्याची योजना असल्याचं अरुण धुमाळ यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुका एप्रिल-मे यादरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. पण पुढील काही दिवसांत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. पण फक्त पहिल्या दहा दिवसांचं वेळापत्रक असेल, असेल असं धुमाळ यांनी सांगितलं.
15 दिवसांचे वेळापत्रक सुरुवातीला जाहीर होणार -
अरुण धुमाळ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आयपीएलच्या नियोजनाबद्दलची माहिती दिली. आयपीएलची स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होईल, असे संकेत त्यांनी यावेळी दिले. यंदाच्या सत्रात पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रक सुरुवातीला जाहीर होईल. उर्वरित सामन्याचे वेळापत्रक लोकसभा निवडणुकीचा तारखा जाहीर झाल्यावर करण्यात येईल, असे धुमाळ यांनी सांगितलं. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कदाचीत लोकसभा निवडणुकाचा तारखा जाहीर होतील, असा अंदाजही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
सरकारसोबत चर्चा सुरु -
यंदाची आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून आयोजित करण्याबाबत प्लॅनिंग सुरु आहे. त्यासाठी सरकारसोबत चर्चा आणि काम सुरु आहे. त्यामुळे आधी आयपीएलचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. लोकसभेच्या तारखा स्पष्ट झाल्यानंतर उर्वरित वेळापत्रक जाहीर कऱण्यात यईल, असे ते म्हणाले.
26 मे रोजी अखेरचा सामना -
जूनमध्ये टी20 विश्वचषक पार पडणार आहे, त्यामुळे आयपीएल स्पर्धा मे अखेरपर्यंत संपेल.विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवर आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी असू शकतो. टी 20 विश्वचषकात भारताचा सलामीचा सामना 5 जून रोजी होणार आहे. 1 जूनपासून टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.
पहिला सामना कुणाचा ?
22 मार्चपासून आयपीएलच्या थराराला सुरुवात होणार आहे. साधारणपणे आयपीएलचा सलामीचा सामना गतविजेते आणि उप विजेते यांच्यामध्ये होतो. त्यानुसार, पहिला सामना धोनीच्या चेन्नई विरोधात शुभमन गिल याच्या गुजरात संघामध्ये होऊ शकतो.
मागील तीन लोकसभा निवडणुकीवेळी काय झालं ?
2009 च्या लोकसभा निवडणुकीवेळी आयपीएल स्पर्धेचा थरार दक्षिण आफ्रिकामध्ये झाला होता. तर 2014 च्या निवडणुकीवेळी अर्धे सामने यूएईमध्ये रंगले होते. पण 2019 च्या निवडणुकीवेळी आयपीएल स्पर्धा भारतामध्येच रंगली होती.
चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा चॅम्पियन
आयपीएल 2023 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. चेन्नईने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला. रवींद्र जडेजाने सामन्याच्या शेवटच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.