PBKS vs RR Live Score : आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. या सामन्यातील नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने लागला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमजन याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिखर धवनच्या नेतृत्वात पंजाब किंग्स पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरेल. राजस्थान संघात आज काहीसा बदल करण्यात आला आहे. आर. अश्विन आजच्या सामन्यातून बाहेर आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची धुसर आशा कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील.


पंजाब आणि राजस्थान आमने-सामने


इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये आज 66 वा सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात संध्याकाळी 07:30 वाजता खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकून आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आपली अंधुकशी आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांचे 13 सामन्यांत समान 12 गुण आहेत, पण उत्तम रनरेटच्या आधारावर राजस्थानचा संघ पंजाबपेक्षा पुढे आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात, पण त्यासाठी त्यांना आजच्या सामन्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागेल. 


PBKS vs RR Playing 11 : दोन्ही संघांची प्लेईंग 11


पंजाब किंग्स


शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, अर्थव तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंह.


राजस्थान रॉयल्स


यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हिटमायर, रियान पराग, अॅडम झॅम्पा, ट्रेंड बोल्ट, नवदीप सैनी, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.


धरमशाला येथील खेळपट्टी कशी असेल? 



2013 मध्ये पहिल्यांदाच धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात 400 हून अधिक धावा झाल्या होत्या. त्यामुळे आजच्या सामन्यात पंजाब आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते, असा अंदाज क्रिडा विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये मदत केली जाऊ शकते. अशावेळी फलंदाजांनी सतर्क राहण्याची गरज आहे. पॉवरप्लेनंतर फलंदाजी अधिक सोपी होईल अशी अपेक्षा आहे.



PBKS vs RR Head to Head : कुणाचं पारडं जड? 


आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत 25 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान राजस्थाननं 14 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे पंजाबनं 11 सामने जिंकले आहेत. मात्र, 16व्या मोसमात पंजाबनं केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे राजस्थानचा वरचष्मा दिसत आहे. पण यावेळी आरआर आपला दबदबा कायम ठेवणार की पंजाब दुहेरी हेडरवरही विजय मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.