IPL 2023 PlayOffs Scenario Chance : सध्या आयपीएलमध्ये (IPL 2023) प्लेऑफची शर्यत फारचं रंगतदार झाली आहे. आयपीएल गुणतालिकेमधील टॉप 4 संघ प्लेऑफमध्ये (IPL 2023 Playoff) पोहोचतात आणि त्यातीलच एक संघ विजेता ठरतो. सध्या प्लेऑफमध्ये गुजरात संघाने स्थान मिळवलं आहे. 31 मार्च पासून सुरु झालेल्या आयपीएल लीगमधील 74 पैकी 65 सामने खेळवले गेले आहेत. पाच सामन्यांनंतर प्लेऑफमधील संघांचं चित्र स्पष्ट होईल आणि त्यातून यंदाचा विजेता मिळेल.
चेन्नई, लखनौ आणि बंगळुरु संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी
आयपीएल 2023 मध्ये सध्या गुजरात टायटन्स संघा वगळता कोणताही संघ अद्याप प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही. आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने बंगळुरु संघाला हरवलं असतं तर, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता होती. पण आरसीबीच्या विजयानंतर प्लेऑफचं सर्व समीकरण बदललं आहे. बंगळुरु संघाने हैदराबाग विरुद्धा सामना जिंकून चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे, शिवाय इतर संघांसाठी प्लेऑफचा मार्गही कठीण केला आहे.
चेन्नई सुपर किंग्स
आयपीएल गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स संघ सध्या 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईलाला शेवटच्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. जर चेन्नई संघ त्यांचा शेवटचा सामना हरला, तर त्यांना प्रार्थना करावी लागेल की मुंबई इंडियन्स, बंगळुरु आणि लखनौ यापैकी एका संघाचा त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभव व्हावा. चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. दिल्ली संघ सध्या प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेला असला, तरी सध्या संघ इतर संघांसाठी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
लखनौ सुपर जायंट्स
लखनौ सुपर जायंट्स गेल्या काही सामन्यांमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. लखनौ संघाकडे13 सामन्यांनंतर 15 गुण आहेत. लखनौला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. लखनौ सुपर जायंट्सचा शेवटचा सामना 20 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरोधात रंगणार आहे. जर लखनौने त्यांचा शेवटचा सामना गमावला तर त्यांना नशीबाची साथ लागेल. त्यांना मुंबई इंडियन्स किंवा बंगळुरु संघ त्यांचा शेवटचा सामना हरण्याची अपेक्षा ठेवावी लागेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी 13 सामन्यांनंतर 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल. यासोबतच मुंबई किंवा चेन्नईने शेवटचा सामना गमावल्यास संघाला संधी मिळेल. बंगळुरु संघाचा नेट-रनरेट मुंबई इंडियन्स संघापेक्षा चांगला आहे. त्यामुळे आरसीबीने शेवटचा सामना जिंकला आणि मुंबईने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध थोड्या फरकाने विजय मिळवला, तरीही आरसीबी संघ संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतो.