PBKS vs KKR, IPL 2023:
पंजाबने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. कोलकात्याने नियमीत अंतराने विकेट गमावल्या. मनदीप सिंह, अनुकूल रॉय आणि रिंकू सिंह यांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. गुरबाज याने सलामीला फटकेबाजी केली. पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गुरबाज 22 धावा काढून बाद झाला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरलेल्या वेंकटेश अय्यरने 34 धावांचे योगदान दिलेय. वेंकटेश अय्यरने 28 चेंडूत 34 धावा केल्या. या खेळीत त्याने एक षटकार आणि तीन चौकार लगावले. कर्णधार नीतीश राणा यानेही 24 धावांचे योगदान दिलेय. राणाने 17 चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. कोलकात्याकडून अष्टपैलू आंद्रे रसेल याने सर्वाधिक 35 धावांचे योगदान दिलेय. रसेल याने 19 चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. शार्दूल ठाकूर 7 तर सुनील नारायण 7 धावांवर नाबाद राहिले.
पंजाबकडून अर्शदीप याने भेदक मारा केली. अर्शदीप याने तीन षटकात 19 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. अर्शदीप याने सुरुवातीलाच कोलकात्याला तीन धक्के दिले. अर्शदीप याने मनदीप सिंह, अनुकुल रॉय यांना बाद करत पंजाबला दणक्यात सुरुवात करुन दिली. त्यानंतर जम बसलेल्या वेंकटेश अय्यरचाही अडथळा त्याने दूर केला. सॅम करन, नॅथन इलीस, सिकंदर रजा आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
त्याआधी नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर पंजाब संघाने निर्धारित 20 षटकात 191 धावांचा डोंगर उभारला. भानुका राजपक्षेचे अर्धशतक आणि सॅम करनच्या फिनिशिंगमुळे पंजाब किंग्सने 191 धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याकडून टीम साऊदीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
भानुका राजपक्षेचा अर्धशतकी तडाखा -
भानुका राजपक्षे याने कोलकाताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. राजपक्षे याने अवघ्या 32 चेंडूत 50 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने दोन षटकार आणि 5 चौकार लगावले. राजपक्षे याने कर्णधार शिखर धवनसोबत 80 पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली. शिखर आणि राजपक्षे यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
शिखर धवनची संयमी खेळी -
कर्णधार शिखर धवन याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. एका बाजूला प्रभसिमरन, राजपक्षे आणि जितेश शर्मा धावांचा पाऊस पाडत होते. तेव्हा धवन याने दुसरी बाजू लावून धरली होती. धवन याने संयमी 40 धावांची खेळी केली. धवन याने 29 चेंडूत 40 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने सहा चौकार लगावले.
खेळी छोटी पण प्रभाव मोठा -
प्रभसिमरन सिंह आणि जितेश शर्मा यांनी छोटेखानी पण प्रभावी खेळी केली. दोघांना मोठी खेळी करता आली नाही , पण प्रभावी खेळी केली. प्रभसिमरन याने सलामीला येत अवघ्या 12 चेंडूत 23 धावांचा पाऊस पाडला. यावेळी त्याने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. तर जितेश शर्माने 11 चेंडूत दोन षटकाराच्या मदतीने 21 धावा केल्या. संघाची धावसंख्या वाढवण्यात या दोन खेळीने महत्वाची भूमिका बजावली.
टीम साऊदीचे अर्धशतक -
टीम साऊदीने सर्वाधिक विकेट घेतल्या पण तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. चार षटकात साऊदीने 54 धावा खर्च केल्या. त्याशिवाय सुनील नारायण याने 40 तर शार्दुल ठाकूर याने 43 धावा खर्च केल्या. साऊदीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर उमेश यादव, नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.