Best Pitch Award Of IPL 2024: : आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला (SRH) पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्स राखून पराभव केला. पण या पराभवादरम्यान सनरायझर्स हैदराबादसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 


हैदराबादच्या होम ग्राऊंड असलेल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानाची खेळपट्टी आयपीएल 2024 च्या हंगामातील सर्वोत्तम खेळपट्टी म्हणून निवडली गेली आहे. या हंगामात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठ्या धावसंख्या होत राहिल्या. याशिवाय गोलंदाजांनाही खेळपट्टीची मदत मिळाली. यासाठी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला बक्षीस म्हणून 50 लाख रुपये मिळणार आहेत.


आयपीएल 2024 च्या हंगामात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादची कामगिरी उत्कृष्ट होती. सनरायझर्स हैदराबादने 14 सामने खेळले, ज्यात 8 जिंकले, तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबाद 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होती. यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर-1 खेळला गेला, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभवाला सामोरे जावे लागले.


राजस्थान रॉयल्सचा पराभव करून अंतिम फेरी गाठली, पण...


क्वालिफायर-2 मध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ सनरायझर्स हैदराबादचा सामना करत होता. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 36 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादला अंतिम फेरीत धडक मारण्यात यश आले. मात्र सनरायझर्स हैदराबादला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने 8 गडी राखून पराभव केला.


कोलकाताचा एकतर्फी विजय-


कोलकाताने आयपीएलच्या अंतिम सामन्यात अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादचा अख्खा डाव 113 धावांत गुंडाळून आपल्या संघाला विजयाची नामी संधी मिळवून दिली. कोलकात्याच्या फलंदाजांनी विजयासाठीचं लक्ष्य अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात आणि तब्बल 57 चेंडू राखून पार केलं. कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरनं नाबाद 52 धावांची, तर रहमानउल्लाह गुरबाजनं 39 धावांची खेळी उभारली. त्याआधी कोलकात्याकडून आंद्रे रसेलनं 19 धावात तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.






संबंधित बातम्या:


IPL 2024: विराट कोहली, रोहित शर्मा ते MS धोनीपर्यंत...; पाहा आयपीएल 2024च्या हंगामातील सर्वात मोठे 5 वाद


IPL 2024 Final Prize Money KKR vs SRH: विजेता, उपविजेता, इमर्जिंग प्लेअर, ऑरेंज- पर्पल कॅप; कोणाला किती रुपये मिळाले?, पाहा A to Z माहिती