IPL 2024 Final KKR vs SRH Marathi News: कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) आयपीएल 2024 चं जेतेपद पटकावलं. चेन्नईतील एमए. चिदंबरम मैदानावर झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) सामन्यात कोलकाताने बाजी मारली. कोलकाताने हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं. (KKR ARE CHAMPIONS OF IPL 2024)


आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात दिमाखदार विजय मिळवत आयपीएलमधील 10 वर्षांचा दुष्काळ संपवला. केकेआरने 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात आयपीएलचा हंगाम जिंकला होता. त्यानंतर 10 वर्षांनी केकेआरला आयपीएलच्या चषकावर नाव कोरण्यात यश आलं आहे. विजेता ठरलेल्या कोलकाताला आयपीएलच्या ट्रॉफीसह 20  कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. तर उपविजेता ठरलेल्या हैदराबादला 12.5 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला 7 कोटी रुपये, तर चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 6.5 कोटी रुपये देण्यात आले. 


कोणाला कोणता पुरस्कार मिळाला?


विजेता संघ- 20 कोटी रुपये (कोलकाता)
उपविजेता संघ- 15.5 कोटी रुपये (हैदराबाद)
तिसऱ्या स्थानावरील संघ- 7 कोटी रुपये (राजस्थान)
चौथ्या स्थानावरील संघ- 6.5 कोटी रुपये (बंगळुरु)
इमर्जिंग प्लेअर- नितीशकुमार रेड्डी (हैदराबाद), 20 लाख रुपये
इलेक्ट्रिक स्ट्राईकर ऑफ द सिझन- जेक फ्रेझर मॅकगर्क (दिल्ली)
फॅन्टसी प्लेअर ऑफ द सिझन- सुनील नरेश (कोलकाता)
सुपर सिक्सेस ऑफ द सिझन- अभिषेक शर्मा (हैदराबाद)
सर्वाधिक चौकार- ट्रॅव्हिस हेड (हैदराबाद)
कॅच ऑफ द सिझन- रमणदीप सिंग (कोलकाता)
फेअरप्ले अवॉर्ड- हैदराबाद
ऑरेंज कॅप- विराट कोहली (741 धावा, बंगळुरु), 15 लाख रुपये
पर्पल कॅप- हर्षल पटेल (24 विकेट्स, पंजाब), 15 लाख रुपये
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर-  12 (सुनील नरेन, कोलकाता), 12 लाख रुपये


कोलकाताचा एकतर्फी विजय-


कोलकाताने आयपीएलच्या अंतिम सामन्यात अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादचा अख्खा डाव 113 धावांत गुंडाळून आपल्या संघाला विजयाची नामी संधी मिळवून दिली. कोलकात्याच्या फलंदाजांनी विजयासाठीचं लक्ष्य अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात आणि तब्बल 57 चेंडू राखून पार केलं. कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरनं नाबाद 52 धावांची, तर रहमानउल्लाह गुरबाजनं 39 धावांची खेळी उभारली. त्याआधी कोलकात्याकडून आंद्रे रसेलनं 19 धावात तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


व्यंकटेश अय्यर आणि रहमानुल्लाहनं गुरबाझनं विजयाचा कळस चढवला


कोलकाताचा सलामीवीर सुनील नरेन आज चांगली कामगिरी करु शकला नाही. पॅट कमिन्सनं त्याला बाद केलं. व्यंकटेश अय्यर आणि रहमानुल्लाह गुरबाझनं आक्रमक फलंदाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांना मॅचवर पकड मिळवू दिली नाही. व्यंकटेश अय्यरनं अर्धशतक करत केकेआरला विजय मिळवून दिला. रहमानुल्लाह गुरबाझला शाहबाझ अहमदनं बाद केलं.  केकेआर आयपीएल ट्रॉफी विजयाचं गिफ्ट सुनील नरेनला वाढदिवसाच्या निमित्तानं दिलं.






संबंधित बातमी:


Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिकच्या घटस्फोट प्रकरणात कृणाल पांड्याची एन्ट्री; नताशाच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष