Navjot Singh Sidhu reaction on Virat Kohli : आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स अर्थात KKR विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अर्थात RCB चा सलामीवीर विराट कोहलीच्या (Virat Kohli) बाद होण्यावरुन मोठा वाद उठला आहे. विराट कोहली ज्या चेंडूवर बाद झाला तो नो बॉल (Virat Kohli No Ball) होता की नाही यावरुन अनेक चर्चा सोशल मीडियावर झडत आहेत. आता माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर नवज्योतसिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनीही विराटला आऊट देण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मी छातीठोकपणे सांगतो, विराट कोहली आऊट नव्हता, असं सिद्धू म्हणाला. 


केकेआरचा गोलंदाज हर्षित राणाच्या (Harshit Rana No Ball) फुलटॉस चेंडूवर विराट कोहली झेलबाद झाला. हर्षित राणानेच त्याचा झेल घेतला. मात्र हर्षितने टाकलेला चेंडू हा कमरेच्या वर असल्याचं प्रथमदर्शनी सर्वांना वाटलं. पण तिसऱ्या पंचांनी अर्थात थर्ड अंपायरने तो बॉल योग्य असल्याचं सांगत, विराटला बाद दिलं. या निर्णयाने विराट कोहलीचा तिळपापड झाला. विराट कोहली पुटपुटतच मैदानाबाहेर गेला. 


सिद्धू नेमकं काय म्हणाला? 


दरम्यान, विराट कोहलीबाबतच्या या निर्णयानंतर नवज्योतसिंह सिद्धूने त्यांच्या स्टाईलमध्ये बेधडक प्रतिक्रिया दिली. सिद्धू म्हणाला, "विराटला आऊट देणं चुकीचं आहे. मी छातीठोकपणे सांगतो, विराट कोहली बाद नव्हता. त्याच्या बॅटवर बॉल लागला त्यावेळी तो बॉल जवळपास दीड फूट वर होता. मला वाटतं हा निर्णय बदलायला हवा. कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय बदलायलाच हवा. त्या एकाच निर्णयामुळे रंगाचा बेरंग झाला"


कोहलीची अंपायर्ससोबत वादवादी


विराट कोहलीला आऊट दिल्यानंतर, त्याने अंपायर्ससोबतही वाद घातल्याचं पाहायला मिळालं. हर्षितने फेकलेला बॉल उंच होता, त्यामुळे आऊट देणं चुकीचं आहे, असं कोहलीचं म्हणणं होतं. पण थर्ड अंपायर्सनेही बाद दिल्याने कोहलीला मैदानाबाहेर जाण्यावाचून पर्याय नव्हता.  


RCB चा केवळ 1 धावेने पराभव


कोलकाता आणि बंगळुरु यांच्यात रविवारी ईडन गार्डन्सवर सामना खेळवण्यात आला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 222 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुने 221 धावा केल्या. RCB चा केवळ 1 धावेने पराभव झाला. त्यामुळे विराटचं बाद होणं हे बंगळुरुच्या आणखी जिव्हारी लागल्याचं दिसून आलं.  


VIDEO :  सिद्धू नेमकं काय म्हणाला?






संबंधित बातम्या  


Virat Kohli : विराट कोहलीचं वर्तन चुकीचं, वाद घालायला नको होता, इरफान पठाणनं सगळं समजावून सांगितलं...