Mumbai Indians vs Chennai Super Kings: वानखेडे मैदानावर काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव झाला. स्पर्धेतील 29व्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी पराभव केला. या सामन्यातील दुसऱ्या डावात मुंबईचे फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड आणि फलंदाज टीम डेव्हिड यांचा अम्पायरसोबत वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई इंडियन्स संघ फलंदाजी करत असताना दुसऱ्या डावातील 15व्या षटकानंतर ही घटना घडली. षटक संपल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड, मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर आणि फलंदाज टिम डेव्हिड मैदानात जाऊ लागले, मात्र चौथ्या अम्पायरने सर्वांना थांबवले आणि मैदानातून बाहेर परत येण्यास सांगितले. वास्तविक मुंबई संघाला 15 व्या षटकानंतर टाइम आऊट हवा होता, परंतु काही गोंधळामुळे ते घेऊ शकले नाही आणि अम्पायरने सर्वांना परत बोलावले.
अम्पायरने पु्न्हा बाहेर बोलावल्यानंतर किरॉन पोलार्ड आणि टीम डेव्हिड अंपायरशी वाद घालताना दिसले. यादरम्यान डेव्हिडने 'टाइम आऊट'चे संकेतही दिले. मात्र चर्चेनंतरही 15 व्या षटक संपल्यानंतर मुंबईला टाइम आऊट देण्यात आला नाही. त्यानंतर 16व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कर्णधार हार्दिक पंड्याची विकेट पडली, त्यानंतर मुंबईला टाइम आऊट देण्यात आला.
चेन्नईच्या मोठ्या धावसंख्येसमोर मुंबई अपयशी-
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 206 धावा केल्या. संघाकडून कर्णधार रुतुराज गायकवाडने सर्वात मोठी खेळी खेळली. गायकवाडने 40 चेंडूंत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 69 धावा केल्या. याशिवाय, शिवम दुबेने वेगवान खेळी खेळली आणि 38 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 66 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 6 गडी बाद 186 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि संघाने 20 धावांनी सामना गमावला.
17व्या मोसमात मुंबईचा चौथा पराभव-
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 17व्या मोसमात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पहिले तीन सामने गमावल्यानंतर मुंबईने दिल्ली आणि आरसीबीविरुद्ध विजय मिळवून दमदार पुनरागमन केले, मात्र सामन्यात पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले.
संबंधित बातम्या:
रोहित शर्माची भर मैदानात उतरली पॅन्ट...; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल, Video एकदा पाहाच!
टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान