Mumbai Indians vs Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्सने (CSK) काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने 20 धावांनी विजय मिळवला. मुंबईकडून रोहित शर्माने एकट्यानं लढा दिला. रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 206 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 69 धावा केल्या. शिवम दुबेने नाबाद 66 धावा केल्या. त्याने 38 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्यानंतर शेवटचे चार चेंडू शिल्लक असताना धोनी फलंदाजी आला आणि त्याने 4 चेंडूत 20 धावा केल्या.
शिवम दुबे आला अन् फिरकी बंद-
चेन्नईच्या डावातील पहिल्या आठपैकी चार षटके मुंबईच्या फिरकी गोलंदाजांनी टाकली होती. यात मोहम्मद नबीच्या तीन, तर श्रेयस गोपालच्या एका षटकाचा समावेश होता. मात्र शिवम दुबे आठव्या षटकांत फलंदाजीला आल्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने फिरकीपटूंना आणखी एकही षटक टाकू दिले नाही. फिरकीपटूंविरुद्ध ताकदवान फटके मारण्यासाठी दुबे ओळखला जातो. दुबेने 2022 च्या हंगामापासून आयपीएलमध्ये फिरकीपटूंविरुद्ध 160 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या असून भारतीय फलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळेच हार्दिकने शिवम दुबे फलंदाजीसाठी आल्यानंतर फिरकीपटूंची गोलंदाजी थांबवली.
हार्दिक पांड्या काय म्हणाला?
निश्चितपणे लक्ष्य गाठता आले असते, पण चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि मथिशा पथिराणाने चांगले चेंडू टाकले. तो त्याच्या प्लॅन्समध्ये खूप हुशार होता आणि त्याने लाँग बाऊंड्रीचा खूप चांगला वापर केला. तो गोलंदाजीसाठी येण्याआधी सामना आमच्या ताब्यात होता. स्टम्पच्या मागे एक माणूस उभा आहे, जो त्यांना योग्य डावपेच शिकवणार, हे त्यांना माहिती आहे, असं म्हणत हार्दिकने धोनीचे कौतुक केली. शिवम दुबेला फिरकीपेक्षा वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळणे कठीण झाले असते, असं हार्दिक म्हणाला. आम्ही काहीतरी वेगळे करू शकलो असतो. आम्हाला चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे, असं हार्दिकने सांगितले.
संबंधित बातम्या:
रोहित शर्माची भर मैदानात उतरली पॅन्ट...; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल, Video एकदा पाहाच!
टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान