Mumbai Indians Hardik Pandya captain IPL 2025 : आयपीएल 2024 मधील निराशाजनक कामगिरीनंतर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने जोरदार पुनरागमन करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने एकूण 5 खेळाडूंना कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा अजूनही या संघासोबत आहे. गेल्या हंगामानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडू शकतो, असे मानले जात होते, मात्र तसे झाले नाही. त्याचबरोबर हार्दिक पांड्यालाही कायम ठेवण्यात आले आहे.
गेल्या वर्षी मुंबईने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवली होती, त्यानंतर रोहित कदाचित संघ सोडू शकतो असे मानले जात होते. मात्र रोहित पुन्हा एकदा फक्त मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. त्याचवेळी हार्दिक पंड्या याशिवाय जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनाही कायम ठेवण्यात आले आहे.
पुढच्या हंगामासाठी कर्णधाराची घोषणा
कायम ठेवण्याच्या यादीसोबतच मुंबई इंडियन्सने पुढच्या मोसमासाठी कर्णधाराचे नावही जाहीर केले आहे. आयपीएल 2025 मध्ये हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार असेल असे मुंबई संघाने जाहीर केले आहे. गेल्या मोसमात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती, मात्र मुंबईने पांड्यावरील विश्वास कायम ठेवला आहे. म्हणजेच आगामी मोसमातही रोहित शर्मा खेळाडू म्हणून खेळणार आहे.
मुंबईने जसप्रीत बुमराहला सर्वाधिक 18 कोटी रुपये दिले आहेत. त्याच वेळी, सूर्यकुमार यादव 16.35 कोटी आणि हार्दिक पांड्याला 16.35 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय रोहितला 16.30 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे तिलक वर्मा पुन्हा एकदा या संघाकडून 8 कोटी रुपये घेऊन खेळताना दिसणार आहेत.