PBKS vs MI, IPL 2024 :अटीतटीच्या सामन्यात मुंबईने पंजाबवर 9 धावांनी विजय मिळवला. मुंबईने दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 183 धावांपर्यंतच मजल मारु शकला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं भेदक मारा करत तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. पंजाबकडून आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर आशुतोष शर्मा यानं एकाट्यानं झुंज दिली. आशुतोष शर्मानं 61 धावांची खेळी केली.
पंजाबची आघाडीची फळी फेल -
मुंबईने दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा सामना कराताना पंजाब किंग्सची सुरुवात अतिशय खराब झाली. पंजाबनं अवघ्या 77 धावांपर्यंत सहा फलंदाज गमावले होते. पंजाबची आघाडीची फळी फेल ठरली होती. एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही. कर्णधार सॅम करन सहा धावा काढून बाद झाला. प्रभसिमरन याला खातेही उघडता आले नाही. रायली रुसो फक्त एक धाव काढून बाद झाला. लियाम लिव्हिंगस्टोनही एका धावेवरच बाद झाला. हरप्रीत सिंह यानं संघर्ष केला पण तोही 13 धावांवर गोपालचा शिकार ठरला. मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर पंजाबची आघाडीची फळी ढेपाळली. जितेश शर्माही फक्त नऊ धावा काढून बाद झाला. पंजाबच्या आघाडीच्या फलंदाजांनी विकेट फेकल्या.
शशांक सिंह अन् आशुतोष शर्माचा लढा -
आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. अडचणीत सापडेल्या पंजाबसाठी शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा पुन्हा एकदा धावून आले. शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांनी मुंबईची गोलंदाजी फोडून काढत विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. शशांक सिंह यानं 25 चेंडूमध्ये 164 च्या स्ट्राईक रेटने 41 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये तीन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. शशांक बाद झाल्यानंतर मुंबई सामना आरामात जिंकेल असं वाटत होतं. पण आशुतोष शर्मा यानं एकाकी झुंज दिली. आशुतोष शर्मा यानं हरप्रीत ब्रार याला सोबत घेत किल्ला लढवला. आशुतोष शर्मा यानं फक्त 28 चेंडूमध्ये 61 धावांचा पाऊस पाडला. आशुतोष शर्मानं 217 च्या स्ट्राईक रेटने मुंबईच्या गोलंदाजांना धुतलं. आशुतोष शर्मानं आपल्या शानदार खेळीमध्ये सात गगनचुंबी षटकार आणि दोन खणखणीत चौकार लगावले. हरप्रीत ब्रार यानं 21 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. हरप्रीत ब्रार यानं एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीनं लढा दिला. पण आशुतोष आणि ब्रार बाद झाल्यानंतर पंजाबच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. रबाडा आठ धावा काढून धावबाद झाला. मुंबईने नऊ धावांनी विजय मिळवत प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय.
बुमराहचा भेदक मारा -
मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं भेदक मारा केला. बुमराहने सॅम करन, रायली रुसो आणि शशांक सिंह यांना तूबंचा रस्ता दाखवला. बुमराहने चार षटकामध्ये फक्त 21 धावा खर्च करत तीन विकेट घेतल्या. गेराल्ड कोइत्जे यानं 4 षटकात 31 धावांच्या मोबदल्यात 3 फलंदाजांना बाद केले. कोइत्जे यानं प्रभसिमरन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि आशुतोष शर्मा यांना बाद केले. हार्दिक पांड्या, आकाश मधवाल आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.