PBKS vs MI  IPL 2024 :  सूर्यकुमार यादवच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर मुंबईनं निर्धारित 20 षटकांमध्ये सात विकेटच्या मोबदल्यात 192 धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादवनं 78 तर रोहित शर्मा 36 आणि तिलक वर्मा 34 धावांची खेळी केली. पंजाबकडून हर्षल पटेल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्यानं तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. पंजाबला विजायासाठी 193 धावांची गरज आहे. 


सूर्याचा झंझावत - 


पंजाबविरोधात सूर्यकुमार यादवनं शानदार फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक रुप घेतलं. सूर्यकुमार यादव यानं धमाकेदार अर्धशतकं ठोकलं. मागील सामन्यात सूर्या स्वस्तात तंबूत परतला होता, त्यामुळे टीका झाली होती. पण आजच्या सामन्यात सूर्यानं सगळी कसर भरुन काढली. सूर्यानं रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागिदारी करत मुंबईच्या डावाला आकार दिला. सूर्यकुमार यादव यानं 53 चेंडूमध्ये 78 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये सूर्यकुमार यादवने तीन षटकार आणि सात चौकार लगावले. सूर्यकुमार यादव यानं 148 च्या स्ट्राईक रेटने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सूर्यकुमार यादव यानं रोहित शर्मासोबत 81 धावांची भागिदारी केली. त्याशिवाय तिलक वर्मासोबत 49 धावांची महत्वाची भागिदारी केली. 


हार्दिक पांड्या पुन्हा फ्लॉप - 


हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. मुंबई इंडियन्सला झटपट धावा कऱण्याची गरज होती, त्यावेळी हार्दिक पांड्याने विकेट फेकली. हार्दिक पांड्याने सहा चेंडूमध्ये एका षटकाराच्या मदतीने 10 धावांची खेळी केली. यंदाच्या आयपीएल हंगामात हार्दिक पांड्याला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही.  हार्दिक पांड्याशिवाय ईशान किशन यालाही मोठी खेळी करता आली नाही. ईशान किशन आठ धावा काढून बाद झाला. यामध्ये फक्त एका चौकाराचा समावेश आहे. 


रोहित शर्माची छोटोखानी खेळी - 


ईशान किशन बाद झाल्यानंतर रोहित शर्मानं सामन्याची सुत्रे हातात घेतली. रोहित शर्मानं सूर्यकुमार यादवच्या साथीनं मुंबईच्या डावाला आकार दिला. दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली. या भागिदारीच्या बळावरच मुंबईच्या धावसंख्येचा पाया रचला गेला. रोहित शर्मानं 25 चेंमडूमध्ये 36 धावांचं योगदान दिले. यामध्ये तीन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होते. 


तिलक वर्माकडून शानदार फिनिशिंग - 


तिलक वर्मा यानं शानदार फिनिशिंग टच दिला. त्याला दुसऱ्या बाजूनं चांगली साथ मिळाली नाही. तिलक वर्मा यानं 18 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे. हार्दिक पांड्या स्वस्तात माघारी परतल्यानंर तिलक वर्मा आणि टीम डेविड यांनी झटपट धावा जमवल्या. टीम डेविड यानं सात चेंडूमध्ये 14 धावांची खेळी केली. या दोघांमध्ये 23 धावांची झटपट भागिदारी झाली. रोमिरिओ शेफर्ड मोठा फटका मारण्याच्या नादात एका धावेवर बाद झाला. अखेरीस मोहम्मद नबीही दावबाद झाला. अखेरच्या षटकात मुंबईने तीन विकेट गमावल्या, अन् धावा फक्त सात काढता आल्या. हर्षल पटेल यानं शानदार गोलंदाजी केली.