चेन्नई : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचं (Chennai Super Kings) प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) विरुद्ध पराभव झाल्यानंतर संपुष्टात आलं. आरसीबीनं चेन्नईला 27 धावांनी पराभूत केलं. चेन्नईला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आरसीबीविरुद्ध 201 धावा करण्याची गरज होती. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 17 धावांची आवश्यकता असताना ते केवळ 7 धावा करु शकले. महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) पहिल्या बॉलवर षटकार मारला. दुसऱ्या बॉलवर यश दयाळला षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. पुढील चार बॉलमध्ये चेन्नईला केवळ एक रन करता आली आणि त्यांचं प्लेऑफमधील आव्हान संपलं. यानंतर महेंद्रसिंह धोनी दुसऱ्याच दिवशी सकाळी रांचीला निघून गेला. यानंतर महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएलमध्ये खेळताना दिसणार की नाही याबाबत चर्चा सुरु झाल्या. धोनी पुढील आयपीएलमध्ये खेळणार की नाही यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित झालं आहे. धोनीनं अंतिम निर्णयासाठी वेळ मागून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


चेन्नईच्या आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर धोनी दुसऱ्याच दिवशी रांचीला गेला. चेन्नई सुपर किंग्जच्या इतर खेळाडूंना धोनीची बंगळुरुतील मॅच शेवटची नसेल असा विश्वास आहे. धोनीनं चेन्नई सुपर किंग्जमधील कुणालाही तो आयपीएल सोडणार असल्याबाबत सांगितलेलं नाही. धोनीनं अंतिम निर्णयासाठी काही महिन्यांची वाट पाहावी, असं संघ व्यवस्थापनाला कळवल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 


महेंद्रसिंह धोनीनं आयपीएलमधील अखेरची मॅच चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर खेळण्याचं प्रॉमिस केलं होतं.  तो ते पूर्ण करेल असा विश्वास चेन्नई सुपर किंग्जला आहे.  धोनीनं बंगळुरु विरुद्धच्या मॅचमध्ये 200 च्या स्ट्राइक रेटनं 25 धावा केल्या होत्या. धोनीचं स्ट्राइक रेट रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांच्यापेक्षा जास्त होतं. 


धोनीनं चार ओव्हरमध्ये फलंदाजी केली त्यावेळी त्याला कोणतीही समस्या जाणवली नाही. धावा काढताना देखील तो योग्य प्रकारे धावत होता, त्याला कसलाही त्रास होत नव्हता हा प्लस पॉइंट होता, असं सूत्रांनी म्हटलं. 


धोनी त्याचं प्रॉमिस पूर्ण करेल, चेन्नईला विश्वास


महेंद्रसिंह धोनी ऐवजी चेन्नईच्या नेतृत्त्वाची धुरा यावेळी ऋतुराज गायकवाडकडे देण्यात आलं होतं. धोनी आणि रवींद्र जडेजानं आरसीबी विरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही. चेन्नईचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिला. 


संबंधित बातम्या :


एमएस धोनीचा आयपीएलमधील हा शेवटचा हंगाम होता?; वीरेंद्र सेहवाग अन् मोहम्मद शमी काय म्हणाले?


IPL 2024 Virat Kohli And MS Dhoni: MS धोनी हात न मिळवताच गेला; विराट कोहली त्याच्या शोधात चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये धावला, Video