IPL 2024 MS Dhoni: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जला बंगळुरुनं 27 धावांनी पराभूत केलं. आरसीबीला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासठी चेन्नईवर 18 धावांनी विजय मिळवणं आवश्यक होतं. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी 17 धावांची गरज होती. बंगळुरुच्या यश दयालने एक विकेट घेत केवळ 7 धावा दिल्या आणि बंगळुरुचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला.
आयपीएल 2024 चा हंगाम हा एमएस धोनीचा (MS Dhoni) शेवटचा हंगाम होता,असं बोललं जात आहे. बंगळुरुविरुद्ध धोनीने शेवटचा सामना खेळला. आता लवकरच धोनी निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. धोनीला या हंगामाच्या सुरुवातीपासूनच गुडघ्याचा त्रास आहे. धोनी या त्रासामुळेच वरच्या क्रमांकावर बॅटिंगला आला नाही. धोनीला धावतानाही त्रास जाणवला. त्यामुळे निवृत्तीच्या चर्चांना आणखी जोर वाढला. मात्र चेन्नई आणि धोनीकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि भारतीय संघाचा खेळाडू मोहम्मद शमीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
गेल्या दोन वर्षांपासून आपण याच विषयावर बोलत आहोत, की धोनीचा शेवटचा हंगाम असेल. यावेळी देखील आयपीएल 2024 च्या हंगामातील धोनीचा बंगळुरुविरुद्धचा सामना अंतिम होता, असं बोलत आहेत. मी आधी म्हटलं होतं की, धोनी या आयपीएलमध्ये याबाबत घोषणा करेल आणि हसत-हसत निवृत्ती घेईल. मात्र चेन्नईने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं नसलं तरी धोनी चांगलं क्रिकेट खेळलं आहे. त्यामुळे धोनी पुढील वर्षी आला तर त्याला शुभेच्छा आणि आयपीएलमध्ये नाही आला, तर त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असल्याचं वीरेंद्र सेहवागने सांगितले. पण मला असं वाटतं धोनीचा हा शेवटचा हंगाम होता, असं सेहवान म्हणाला.
मोहम्मद शमी काय म्हणाला?
एमएस धोनी अचानक कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. पण मला देखील यावर्षी वाटलं होतं की हा धोनीचा आयपीएलमधील शेवटचा हंगाम असले. परंतु धोनीने ज्या प्रकारे क्रिकेट खेळले, ते पाहून वाटत नाही तो निवृत्तीचा निर्णय घेईल. धोनी क्रिकेट खेळून इन्जॉय करतोय, असं मोहम्मद शमीने सांगितले.