MS Dhoni IPL Record : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. आयपीएलला सुरुवात होण्याआधीच धोनीने चेन्नईचं (chennai super kings) कर्णधारपद सोडत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच धोनी कर्णधार नसणार आहे. यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यापासूनच धोनीची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत आहे. पहिल्याच सामन्यात धोनीने अर्धशतकी खेळी केली, त्याशिवाय दुसऱ्या सामन्यात फिनिशिंग टच दिला. 


या आयपीएल स्पर्धेत अनेक विक्रम मोडले जातील, पण धोनीचा विक्रम कुणालाही मोडणं शक्य नाही. फिनिशर म्हणून धोनीचा विक्रम पुढील कित्येक दिवस अबाधित राहणार आहे. कारण, धोनीच्या या विक्रमाच्या जवळ एकही खेळाडू नाही. डेथ ओव्हर्समध्ये धोनी गोलंदाजांची पिसे काढतो. तुफान फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन देतो. 15 व्या षटकांपासून धोनीचं आक्रमक रुप पाहायला मिळतं. 15 ते 20 या षटकात धोनीने सर्वाधिक धावा वसूल केल्या आहेत. 


लखनौविरोधातील सामन्यात धोनीने सहा चेंडूत नाबाद 16 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान धोनीने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. आयपीएलच्या अखेरच्या षटकात धोनीच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद आहे. आयपीएल इतिहासात डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक धावा धोनीच्या नावावर आहेत. धोनीने 20 षटकांत आतापर्यंत 627 धावांचा पाऊस पाडला आहे. या आयपीएल इतिहासात 20 षटकांत सर्वाधिक धावा आहेत. 


धोनी आयपीएलचा सर्वात यशस्वी फिनिशर आहे. अखेरच्या पाच षटकांत धोनी मैदानावर असेल तर धावांचा पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. गोलंदाजांची पिटाई ठरलेलीच. 15 व्या षटकांपासूनच धोनी धावांचा पाऊस पाडतो. अखेरच्या पाच षटकांत सर्वाधिक धावा काढण्याचा मान धोनीच्या नावावर आहे. चेन्नईचा माजी कर्णधार धोनीने 15 व्या षटकात 444 धावा चोपल्या आहेत. तर 16 व्या षटकात 482, 17 व्या षटकात 574, 18 व्या षटकांत 620, 19 व्या षटकात 627 आणि अखेरच्या 20 व्या षटकांत धोनीने 627 धावांचा पाऊस पाडला आहे.