MS Dhoni, IPL 2022 : चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 210 धावांचा डोंगर उभा केला आहे. चेन्नईच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करत लखनौच्या गोलंदाजांची पिसे काढली. यामध्ये धोनीनेही विस्फोटक फलंदाजी करत छोटेखानी खेळी केली. धोनीने नाबाद 16 धावांची खेळी केली. या खेळीनंतर धोनीने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. धोनीने टी20 क्रिकेटमध्ये सात हजार धावांचा टप्पा पार केला आहे. सात हजार धावा करणारा धोनी पाचवा भारतीय खेळाडू आहे.  भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा वेस्ट विंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहेत. (MS Dhoni Record Surpasses 7000 run mark t20 cricket)
 
लखनौविरोधात धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजासाठी उतरला होता. धोनीने सहा चेंडूत 16 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि दोन चौकार लगावले. धोनीने मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार खेचला होता. या 16 धावांच्या खेळीच्या मदतीने धोनीने टी 20 क्रिकेटमध्ये सात हजार धावांचा पल्ला पार केला. धोनीने या सात हजार धावा टीम इंडिया, चेन्नई सुपरकिंग्स, पुणे सुपर जाएंट्स आणि झारखंड संघाकडून खेळताना केल्या आहेत. धोनीने 349 टी 20 सामन्यात 7001 धावा केल्या आहेत.  


टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 328 सामन्यात दहा हजार 326 धावा केल्या आहेत. यादरम्यान कोहलीने 76 अर्धशतक आणि पाच शतकं झळकावली आहेत. कोहलीने या धावा टीम इंडिया, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली संघासाठी केल्या आहेत.  भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने टीम इंडिया, मुंबई इंडियन्स, मुंबई आणि डेक्कन चार्जेसकडून खेळताना 371 सामन्यात 9936 धावा चोपल्या आहेत. या खेळीदरम्यान रोहित शर्माने 69 अर्धशतकं आणि सहा शतकं लगावली आहेत. रोहितनंतर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे. धवनने 8818 धावा चोपल्यात. त्यानंतर सुरश रैनाचा क्रमांक लागतो. रैनाने 8654 धावा केल्या आहेत.