KKR Mitchell Starc: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मिचेल स्टार्क हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र मिचेल स्टार्कचा दोन सामन्यातील कामगिरी पाहता केकेआरचे 24.75 कोटी पाण्यात गेले की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे. 


स्टार्कची आयपीएलमध्ये आतापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने खूप धावा दिल्या असून त्याला एकही विकेट घेण्यात अद्याप यश मिळालेले नाही. स्टार्कने दोन सामन्यात 8 षटके टाकली.यामध्ये त्याने एकूण 100 धावा दिल्या. स्टार्कच्या या कामगिरीवरुन त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. 


स्टाकर्च्या या कामगिरीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण म्हणाला की, जेव्हा तो चेंडू आत स्विंग करतो तेव्हा स्टार्क सर्वोत्तम असतो. जेव्हा हा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजाला येतो तेव्हा तो खूपच धोकादायक बनतो. गेल्या दोन सामन्यांत मी त्याच्याकडून असे चेंडू पाहिलेले नाहीत. मात्र त्याने भारतीय खेळपट्टीशी जूळवून घेतल्यास आणि त्याचा चेंडू स्विंग झाल्यास तो आयपीएलमधील धोकादायक गोलंदाज ठरले, असं इरफान पठाणने सांगितले. स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना इरफान पठाणने हे भाष्य केलं. 


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर मिचेल स्टार्कबद्दल म्हणाला की, मला वाटते की या सामन्यात तो उजव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न करत होता. हा एक चांगला पर्याय आहे. पण मला वाटते की त्याने चेंडूची लाइन खाली ठेवावी. तो डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे जो ताशी 145+ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करू शकतो. जेव्हा त्याचा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध स्विंग होतो, तेव्हा तो सर्वात धोकादायक चेंडूंपौकी एक असतो. अशा परिस्थितीत मला त्याच्याकडून अशी विविधता पाहायला आवडेल, असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला. 


8 षटकांत 100 धावा-


मिचेल स्टार्ककडून कोलकाता नाईट रायडर्सला बऱ्याच अपेक्षा आहेत. कोलकात्याच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा असेल अशी आशा आहे. पण पहिल्या दोन सामन्यात मिचेल स्टार्क पूर्णपणे फेल ठरला. हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही स्टार्कने 4 षटकात 53 धावा दिल्या होत्या. या सामन्यात तो सर्वात महागडा खेळाडू तर ठरलाच पण एकही विकेट घेता आली नाही. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यातही स्टार्कने 4 षटकात 47 धावा दिल्या. या सामन्यातही स्टार्कला एकही विकेट घेता आली नाही. स्टार्कने आतापर्यंत 8 षटके टाकली असून एकही विकेट न घेता 100 धावा दिल्या आहेत.


संबंधित बातमी:


आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, Photos