MI vs CSK, IPL 2024 : आयपीएलच्या मैदानात आज एल क्लासिको सामना रंगाणार आहे. मुंबई आणि चेन्नई (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यामध्ये वानखेडे स्टेडियमर आमनासामना होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (MI) विजयाची हॅट्ट्रीक करण्यासाठी मैदानात उतरणार आहे, तर चेन्नईचा संघ आपल्या चौथ्या विजयासाठी सज्ज असेल. आज विजय दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. मुंबई आणि चेन्नईच्या ताफ्यात दिग्गजांचा भरणा आहे. पण आज कोणते पाच खेळाडू चमकू शकतात, याबाबत जाणून घेणार आहोत. मुंबई आणि चेन्नई संघातील कोणते खेळाडू आज गेमचेंजर ठरु शकतात, याबाबत जाणून घेऊयात...


 शिवम दुबे Shivam Dube- 


आयपीएलच्या मागील दोन हंगामात शिवब दुबे यानं प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला आहे. शिवम दुबे याचा फॉर्म यंदाही कायम आहे. दुबे मैदानात आल्यानंतर सामना चेन्नईच्या बाजूने झुकतोच. दुबे यानं पाच सामन्यात 176 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. शिवम दुबे यानं 160 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला आहे. त्यानं पाच सामन्यात 10 चौकार आणि 13 षटकार ठोकले आहेत. चेन्नईकडून सर्वाधिक धावांचा मान शिवम दुबेच्या नावावर आहे. आजच्या सामन्यात शिवम दुबे कशी फलंदाजी करतो? याकडेही सर्वांचं लक्ष असेल. 


जसप्रीत बुमराह Jasprit Bumrah -


आयपीएल 2024 ची पर्पल कॅप स्पर्धेत जसप्रीत बुमराह सर्वात आघाडीवर आहे. बुमराहने आरसीबीविरोधात वानखेडे स्टेडियमवरच पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. अचूक टप्प्यावर मारा कऱण्यात बुमराह माहीर आहे. स्लोअर बॉल, यॉर्कर चेंडू टाकण्यात बुमराह तरबेज आहे. बुमराह कोणत्याही टप्प्यावर गोलंदाजी करु शकतो. पॉवरप्ले असो अथवा फिनिशिंग... बुमराह कुठेही आपला प्रभाव पाडू शकतो. चेन्नईविरोधात विजय मिळवयाच असेल तर बुमराह फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे. जसप्रीत बुमराहने पाच सामन्यात दहा विकेट घेतल्या आहेत. 


सूर्यकुमार यादव Suryakumar Yadav - 


आयपीएल 2024 च्या सुरुवातीला दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव संघाबाहेर होता. पण सूर्यकुमार परतल्यानंतर मुंबईची ताकद वाढली. मिस्टर 360 म्हणून ओळख असलेल्या सूर्याकडे आज सर्वांच्या नजरा असतील. सूर्यकुमार यादव मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यावर मोठे फटके मारण्यात तरबेज आहे. आरसीबीविरोधात सूर्यानं फक्त 19 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. चेन्नईसाठी सूर्या हा सर्वात मोठा धोका असेल. 


रचिन रवींद्र Rachin Ravindra - 


आयपीएलच्या पदार्पणातच रचिन रवींद्र यानं सर्वांची मनं जिंकली आहे. ऋतुराज गायकवाड याच्यासोबत रचिन रवींद्र यानं चेन्नईला वेगवान सुरुवात दिली. दुखापतग्रस्त डेवॉन कॉन्वे याच्याजागी त्याची वर्णी लागली होती. रचीन रवींद्र यानं गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आपली भूमिका चोख बजावली आहे. पॉवरप्लेमध्ये त्यानं खोऱ्यानं धावा चोपल्या आहेत. मुंबईविरोधातही रचिन रवींद्र मोठी खेळी करु शकतो. 


 रवींद्र जाडेजा Ravindra Jadeja - 


रवींद्र जाडेजा चेन्नईसाठी एक्स फॅक्टर ठरणार आहे. जाडेजानं गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आपलं योगदान दिलेय. त्यानं फलंदाजीमध्ये पाच डावात 84 धावा केल्या आहेत. तो तीन वेळा नाबाद राहिला आहे. त्याशिवाय चार विकेटही घेतल्या आहेत. आजच्या सामन्यात रवींद्र जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील.