MI Vs GT: IPL 2024: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला. गुजरातच्या माऱ्यापुढे मुंबईच्या (MI) फलंदाजांनी हाराकिरी केली. गुजरातने (GT) दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 162 धावांपर्यंत मजल मारली. 


शेवटच्या षटकांमध्ये गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी अतिशय तगडी गोलंदाजी केली. मोहित शर्मा, उमेश यादव आणि राशिद खान या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांनी गुजरात टायटन्सला शेवटच्या 5 षटकांमध्ये मुंबई इंडियन्सवर विजय मिळवण्यास कशी मदत केली ते जाणून घ्या. 15 षटकं संपल्यानंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या 3 बाद 126 धावा होती आणि संघाला विजयासाठी 5 षटकात 43 धावांची गरज होती.






16 व्या षटकांत काय झालं?


मोहित शर्मा 16 व्या षटकात गोलंदाजीसाठी आला, ज्यामध्ये त्याने फक्त 4 धावा दिल्या. या षटकात सामन्याचा टर्निंग पॉइंटही आला, कारण या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डेवाल्ड ब्रेव्हिसला मोहितने झेलबाद केले. ब्रेव्हिस 46 धावा करून क्रीजवर होता, त्यामुळे त्याचा बाद होणे हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का होता.


17 व्या षटकांत काय घडलं?


राशीद खानने टाकलेल्या 17व्या षटकातही केवळ 3 धावा झाल्या, त्यामुळे मुंबई मोठ्या प्रमाणावर बॅकफूटवर गेली. राशीदच्या षटकांत फक्त 3 एकेरी आले आणि येथून मुंबईला शेवटच्या 3 षटकात 36 धावांची गरज होती.


18 वे षटकांत पुन्हा मोहित शर्मा-


18 वे षटकही मोहित शर्माच्या हातात देण्यात आले. मोहितने षटकाच्या पहिल्या 4 चेंडूत 9 धावा दिल्या होत्या. मुंबई सामन्यात पुनरागमन करत आहे असे वाटत होते, पण नंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टीम डेव्हिड झेलबाद झाला. 


19 वे आणि महत्त्वाचे षटक स्पेन्सर जॉन्सनच्या हाती-


19 वे आणि महत्त्वाचे षटक स्पेन्सर जॉन्सनने टाकले.  तिलक वर्माने पहिल्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला असला तरी दुसऱ्याच चेंडूवर तिलकने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. जॉन्सनच्या षटकात 8 धावा आल्या आणि शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सला 19 धावांची गरज होती.


20 व्या षटकांत 19 धावांची गरज-


20व्या षटकांत कर्णधार हार्दिक पांड्याला उमेश यादवसमोर मोठे फटके खेळावे लागले. पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारुन हार्दिकने मुंबईच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या होत्या, पण तिसऱ्या चेंडूवर चुकीच्या वेळेवर मारलेल्या शॉटमुळे हार्दिक लाँग-ऑनवर झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर पियुष चावलाही पॅव्हेलियनमध्ये परतला. उमेश यादवला हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नाही, पण गुजरातचा 6 धावांनी विजय निश्चित केला.