IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार प्रदर्शन करत गुजरातच्या (Gujrat Titans) संघानं विजेतेपद पटकावलं. गुजरातच्या यशात अनेक स्टार फलंदाजांनी महत्वाची भूमिका बजावली. परंतु, गुजरातचा एक फलंदाज आयपीएलच्या संपूर्ण हंगामात संघर्ष करताना दिसलाय. ज्यामुळं आयपीएलचा पंधरावा हंगाम त्याच्यासाठी शेवटचा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज मॅथ्यू वेडसाठी आयपीएलचा यंदाचा हंगाम खराब ठरलाय. सामन्यादरम्यान, गोलंदाजांचं कंबरडं मोडणारा मॅथ्यू वेड आयपीएलमध्ये मात्र संघर्ष करताना दिसला. एवढेच नव्हेतर, गुजरातच्या संघाची तो सर्वात मोठी कमजोरी ठरला, असं बोलणं वावगं ठरणार नाही. आयपीएल 2022 मध्ये त्यानं 10 सामने खेळले. ज्यात त्याला फक्त 157 धावा करता आल्या. त्याच्या खराब प्रदर्शनानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यानं त्याला पुन्हा प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली. परंतु, त्या संधीचं त्याला सोनं करता आलं नाही. दरम्यान, त्याचं खराब प्रदर्शन पाहून गुजरातचा संघ त्याला पुन्हा संघात रिटेन करेल, याची शक्यता कमी आहे. ज्यामुळं त्याचं आयपीएल करिअर धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. 


तब्बल 11 वर्षानंतर मॅथ्यू वेडचं आयपीएलमध्ये मिळाली संधी
मॅथ्यू वेडचे 11 वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन झालं . चालू हंगामापूर्वी तो आयपीएल 2022 मध्ये फक्त तीन सामने खेळला होता. परंतु आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सनं त्याला 2 कोटी 40 लाखात विकत घेऊन संघात सामील केलं ऑस्ट्रेलियन संघाला 2021 चा टी-20 विश्वचषक मिळवून देण्यात वेडनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण आयपीएल 2022 मध्ये वेडची बॅट शांत राहिली. आता त्याच्या आयपीएल कारकिर्दीवर टांगती तलवार आहे.


गुजरातचा राजस्थानवर सात विकेट्स राखून विजय
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सॅमसनचा हा निर्णय चुकीचा ठरला. राजस्थान रॉयल्सला 20 षटकांत 9 विकेट्स गमावून केवळ 130 धावा करता आल्या. गुजरात टायटन्सनं हे लक्ष्य 18.1 षटकांत सात विकेट्स राखून पूर्ण केलं.


हे देखील वाचा-