Ashish Nehra: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियवर (Narendra Modi Stadium) रविवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थानचा (Gujrat Titans vs Rajasthan Royals) पराभव करून आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. गुजरातच्या या विजयात संघातील खेळाडूंसह कोचिंग स्टाफनंही महत्वाची भूमिका बजावली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहराकडं (Ashish Nehra) गुजरातच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी त्यानं चोखपणे पार पाडली. यामुळं गुजरातच्या विजयासह आशिष नेहराच्याही नावावर अनोख्या विक्रमाची नोंद झालीय. आयपीएलचे आतापर्यंत पंधरा हंगाम पार पडले. त्यापैकी 14 हंगामात विजयी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी विदेशी खेळाडूंनी संभाळली. त्यानंतर विजयी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आशिष नेहरा पहिल्याच भारतीय खेळाडू ठरलाय.
दरम्यान, गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा यांची जोडी सुपरहीट ठरली. कर्णधार म्हणून हार्दिकचा हा पदार्पणाचा हंगाम होता, तर मुख्य प्रशिक्षक म्हणून आशिष नेहराचाही हा पहिलाच आयपीएल हंगाम होता. आशिष नेहरा आयपीएलच्या इतिहासातील पहिला भारतीय मुख्य प्रशिक्षक बनला आहे, ज्यानं आपल्या संघासाठी आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. या हंगामापूर्वी खेळल्या गेलेल्या सर्व हंगामात संघांचे मुख्य प्रशिक्षक विदेशी होते.
हे विदेशी खेळाडू विजयी संघाचे मुख्य प्रशिक्षक
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. या सर्व हंगामात श्रीलंकेचा महिला जयवर्धने मुंबईच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. तर, मुख्य प्रशिक्षक म्हणून स्टीफन फ्लेमिंगनं चेन्नईला चार वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्याचबरोबर टॉम मूडी, रिकी पाँटिंग, जॉन राइट, डॅरेन लेहमन आणि शेन वॉर्न यांनी प्रत्येकी एकदा आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. आशिष नेहरानं आता या यादीत प्रवेश केला आहे, जो पहिला भारतीय मुख्य प्रशिक्षक आहे.
गुजरात टायटन्सचा प्रवास
आयपीएल 2022 मधील साखळी सामन्यात गुजरातच्या संघानं 14 पैकी 10 सामन्यात विजय मिळवला. आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातचा सामना राजस्थानशी झाला होता. त्या सामन्यात राजस्थानला पराभूत करून अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यानंतर राजस्थानच्या संघानं दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात लखनौचा पराभव करून अंतिम फेरीत एन्ट्री केली. आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर सात विकेट्सनं विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं.
हे देखील वाचा-