LSG vs SRH हैदराबाद : आयपीएलमध्ये (IPL) काल झालेली सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) आणि लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) यांच्यातील मॅच ऐतिहासिक ठरली. सनरायजर्स हैदराबादनं लखनौ सुपर जाएंटसला 10 विकेट राखून आणि 62 बॉल बाकी असताना पराभूत केलं. लखनौनं विजयासाठी ठेवलेलं 166 धावांचं आव्हान हैदराबादच्या सलामीच्या जोडीनं अवघ्या 58 बॉलमध्ये पूर्ण केलं.  सनरायजर्स हैदराबादकडून झालेला पराभव लखनौच्या जिव्हारी लागला. लखनौ सुपर जाएंटसनं पराभवानंतर सलग चार ट्विट केली आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी दोन मीम्स पोस्ट केलीत. एका ट्विटमध्ये हैदराबादचं त्यांनी कौतुक केलंय तर एका ट्विटमध्ये त्यांनी पराभवामुळं दुखावलो असल्याचं म्हटल आहे. 


पराभवानंतर लखनौची ट्विटची मालिका 


लखनौ सुपर जाएंटसचा हैदराबादकडून दारुण पराभव झाला. लखनौनं केएल राहुल, आयुष बदोनी आणि निकोलस पूरन यांच्या फलंदाजीच्या जोरावर 4 विकेटवर 165 धावा केल्या होत्या. विजयासाठी हैदराबादला 166 धावांची आवश्यकता होती. हैदराबादच्या सलामीच्या जोडीनं प्लेऑफचं गणित लक्षात ठेवत सुरुवातीपासूनचं आक्रमक फलंदाजी सुरु केली होती. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं दमदार फलंदाजी करत हैदराबादला दहाव्या ओव्हरमध्येच विजय मिळवून दिलाय.  या पराभवानंतर लखनौ सुपर जाएंटसच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चार पोस्ट करण्यात आल्या. 


लखनौनं सुरुवातील दोन मीम्स पोस्ट केली आहेत. यापैकी एका पोस्टमध्ये लखनौनं तेलुगु सुपरस्टार विनोदी अभिनेते ब्रह्मानंदम यांचा फोटो पोस्ट करत ओके बाय असं कॅप्शन दिलं आहे. 






लखनौकडून हैदराबादचं कौतुक 


आम्ही टीव्हीवर बॅटिंग पाहिली पण ती अविश्वसनीय होती, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. आम्ही आजच्यासारखं यापूर्वी कधीही दुखावलो गेलो नव्हतो. मात्र, आम्ही हैदराबादनं ज्या प्रकारे धावसंख्येचा पाठलाग केला त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो, असं लखनौनं म्हटलं आहे. 







संपूर्ण मॅचमुळं आम्ही दुखावलो गेलो आहोत. मात्र, आम्ही उप्पल येथे आमच्या पाठिशी राहणाऱ्या, सोशल मीडियावर आमच्या बाजूनं राहणाऱ्या आणि पाठिंब्यासाठी कमेंट करणाऱ्यांचे ऋणी आहोत. आमची टीम गेल्या दोन वर्षांपासून चांगली कामगिरी करतेय. आम्ही तशीच कामगिरी पुन्हा करुन दाखवू. आमच्यासोबत उभं राहिल्याबद्दल धन्यवाद, असं लखनौ सुपर जाएंटसनं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय.






एका नेटकऱ्याच्या कमेंटला उत्तर देताना लखनौ सुपर जाएंटसनं आम्ही उद्यापासून नवी सुरुवात करुन ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी लढू, दोन मॅच राहिलेत, त्या दोन्ही जिंकू आता काम करण्याची वेळ आलीय, असं ट्विट लखनौननं केलंय. 


संबंधित बातम्या : 


KL Rahul : संघमालकानं ऑन कॅमेरा सुनावलं, तू तात्काळ लखनौची टीम सोड, केएल राहुलकडे कुणी केली मागणी,काय घडलं? पाहा व्हिडीओ


IPL 2024 : हैदराबादच्या वादळी विजयानंतर मुंबई प्लेऑफमधून बाहेर, पाच संघाची स्थितीही नाजूक