SRH vs LSG : सनरायजर्स हैदराबादने बुधवारी लखनौ सुपर जायंट्सविरोधात विराट विजय मिळवला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या वादळी फलंदाजीच्या बळावर हैदराबादने दहा विकेट आणि दहा षटके राखून विजय मिळवला. हैदराबादने यंदाच्या हंगामातील सातव्या विजायची नोंद केली. हैदराबादने 12 सामन्यात 14 गुणांची कमाई करत प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलेय. हैदराबादच्या विशाल विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या उरल्या सुरल्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. त्याशिवाय पाच संघाची स्थितीही नाजूक झाली आहे.
मुंबईचा संघ प्लेऑफमधून बाहेर
लखनौच्या दारुण पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. प्लेऑफमधून बाहेर जाणारा मुंबई यंदाचा पहिला संघ ठरलाय. आयपीएल 2024 मध्ये मुंबईने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. या सामन्यात मुंबईला फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आलाय. मुंबई इंडियन्सने पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवला तरी त्यांचे 12 गुण होतील. पण चेन्नई, लखनौ आणि दिल्ली यांचे आधीच प्रत्येकी 12 गुण आहेत. या सर्वांचे अद्याप सामने शिल्लक आहेत. त्यामध्ये त्यांनी एकजरी विजय मिळवला तर ते मुंबईपेक्षा पुढे जातील. मुंबईला आता 14 गुणापर्यंत पोहचता येणार नाही, त्यामुळे आता त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
हैदराबादची मोठी झेप -
लखनौचा दारुण पराभव करत हैदराबादने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. 14 गुणांसह हैदराबादचा संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी 16 गुणांसह पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. हैदराबादच्या विजायाचा फटका चेन्नईला बसला आहे. चेन्नईची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. हैदराबादने विराट विजयानंतर रनरेटही सुधारला आहे. चेन्नईचा संघ 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
3 संघाची स्थिती बिकट -
हैदराबादच्या विराट विजयानंतर आरसीबी, पंजाब अन् गुजरात यांची स्थिती आता आणखी खराब झाली आहे. त्याशिवाय दिल्ली आणि लखनौ यांचेही आव्हान अधिक खडतर झालेय. आतापर्यंत फक्त मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. पण इतर 5 संघांना अद्याप प्लेऑफच्या आशा आहेत. पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीकडे 12 गुण आहेत, त्यांचे अद्याप दोन सामने शिल्लक आहेत. त्यांनी दोनी सामन्यात बाजी मारली तर त्यांना संधी मिळू शकते. लखनौ सहाव्या क्रमांकावर आहे, त्यांचेही 12 गुण आहेत. त्यांचेही दोन सामने शिल्लक आहेत. पण त्यांचा एक सामना दिल्लीविरोधात आहे. दिल्ली आणि लखनौ यांच्यातील विजेता संघ प्लेऑफसाठी अधिक भक्कम पाऊल टाकेल.
त्याशिवाय RCB, PBKS आणि GT यांचे आतापर्यंत 11-11 सामने झाले आहेत. त्यांचे प्रत्येकी 8 गुण आहेत. या तिन्ही संघाकडे प्लेऑफची संधी आहे. पण सर्व सामन्यात बाजी मारावीच लागेल, त्याशिवाय इतरांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. आरसीबी आणि पंजाब यांच्यात गुरुवारी सामना होणार आहे, यातील विजेत्या संघाची प्लेऑफची संधी जास्त असेल.